...या जिल्ह्यात शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

संजय कापसे
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या ६१ हजार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी सहा हजार आठशे रुपयाची मदत देण्यासंदर्भात महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सुपूर्द केला आहे. रब्बी हंगामासाठी ही मदत कामी येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. परंतु, राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केव्हा व कधी मिळणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या ६१ हजार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी सहा हजार आठशे रुपयाची मदत देण्यासंदर्भात महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सुपूर्द केला आहे. रब्बी हंगामासाठी ही मदत कामी येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. परंतु, राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केव्हा व कधी मिळणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परतीच्या पावसामध्ये तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, उडीद, मूग या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचे झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा आधार मिळणे आवश्यक झाले आहे. 
पावसामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या सर्वेक्षणाचे काम प्रशासनाने हाती घेत पूर्ण केले.

५२ हजार ३०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान
 यामध्ये तालुक्यातील एकूण खरीप पेरणी क्षेत्र ७८ हजार ५३० हेक्टर जमिनीपैकी जवळपास ५२ हजार ३०० हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामा अहवालावरून स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी प्रशासनाकडून किती व कशी मदत द्यावी यासंदर्भात मतभिन्नता असून शासनस्तरावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी सहा हजार आठशे रुपये देण्याचे निकष आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने अहवाल तयार केला आहे.

३५ कोटी रुपयांची मागणी
 त्यानुसार नुकसानग्रस्त ६१ हजार ६३४ शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी सहा हजार आठशे रुपये नुकसान भरपाई देण्यासंदर्भात प्रशासनाकडे जवळपास ३५ कोटी रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय स्थिती पाहता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याकरता प्रशासकीय पातळीवर तातडीने निर्णय घेतले जातील का? याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. मिळालेल्या मदतीमधून किमान रब्बी हंगामातील बी-बियाणांची खरेदी करून पेरणी करता येईल, अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

विमा कंपनीने वाऱ्यावर सोडले?
पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने वाऱ्यावर सोडले आहे. मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्यानंतर विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आता उजाड झालेल्या शेतीमधून पिकाची पाहणी करण्याचा फंडा अवलंबविला आहे. या प्रकारामुळे विमा कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

परतीच्या पावसामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसामध्ये भिजून खराब झाले आहे. पीकविमा काढल्यानंतरही विमा कंपनीचे धोरण पाहता मदत मिळेल किंवा नाही याबाबत साशंकता आहे. या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा आधार मिळाला पाहिजे. 
- डिगांबर वाघमारे, शेतकरी, सांडस
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... awaiting grant for farmers in this district