आयुर्वेदातील ‘हे’ गुणकारी झाड होतंय दुर्मिळ  : कोणते ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 January 2020

पायात काटा मोडला असेल तर दिव्यावर बिब्बा तापवून काटा मोडलेल्या ठिकाणी बिब्याचा फणका दिला जातो. आजही ही उपचार पद्धती ग्रामीण भागातून दिसून येत आहे. मात्र, आता ही उपचार पद्धती अतिशय दुर्मिळ झालेली आहे.

नांदेड : ग्रामीण भागात गरिबांच्या जखमेवर जालीम औषधी म्हणून उपयोगी पडणारे, तसेच गावरान मेवा म्हणून ओळख असलेल्या बिब्याची झाडे सद्यस्थितीमध्ये इतिहासजमा झाल्याचे दिसत आहे. याला लाकूड तस्करीचा परिणाम कारणीभूत असून, वनौषधींसह जंगलसंपत्तीच्या संरक्षणासाठी वनविभाग अपयशी ठरत असल्याचेही यावरून स्पष्टपणे दिसत आहे.

Image may contain: fruit and food
बिब्ब्याचे संग्रहित छायाचित्र

मार्गशीर्ष व पौष महिन्यात जंगल परिसरासह माळरानावर बिब्याच्या वृक्षाला बहर येत असल्याचे पूर्वी दिसत. परंतु, अलिकडे शहर, रस्ते विस्तारासाठी सर्रासपणे वृक्षतोड सुरु आहे. यामध्ये अनेक वनऔषधी वनस्पतींचा समावेश होतो आहे. त्यापैकीच एक असलेले बिब्याचे झाड. लाकूड तस्करीमुळे ही झाडे आता इतिहासजमा होताना दिसत आहे. पायात काटा मोडला असेल तर दिव्यावर बिब्बा तापवून काटा मोडलेल्या ठिकाणी बिब्याचा फणका दिला जातो. आजही ही उपचार पद्धती ग्रामीण भागातून दिसून येत आहे. मात्र, आता ही उपचार पद्धती अतिशय दुर्मिळ झालेली आहे.

बिब्ब्याचे तेल गुणकारी
नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, इस्लापूर आदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या वनौषधी वनस्पती असून त्याचे संगोपन व्यवस्थित होत नाही. पूर्वी मार्गशीर्ष व पौष महिन्यात माळरानावर तसेच शेतशिवारातील जमिनींवर बिब्याचे वृक्ष धुरे-बांधे काळ्या पिवळ्या बिब्यांनी फुलून जायचे. लाकडाला कीड लागू नये, म्हणून बिब्याचे तेल बैलगाडीचा पाळणा, चाके यांना लावले जायचे. त्याचबरोबर घरातील सूप, दुरडी यांनाही बिब्याचे तेल लावले जात असल्याचे शेतकरी बाबासाहेब जाधव यांनी सांगितले.

बिब्ब्याची चव आजही आहे जिभेवर
बिबा हा बहुगुणी व बहुउपयोगी आहे. एका काळात या ग्रामीण भागात खूपच बिब्यांच्या झाडांची उपलब्धता होती. प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःची चार-सहा तरी हक्काची झाडे होती. त्या काळात पिवळ्याजर्द बिब्याच्या पलकुच्या पोळ्या केल्या जायच्या. आमच्या लहानपणे आम्ही खूपदा खाल्ल्याही. ती चव अजूनही जिभेवर आहे. आता खायला सोडा; पाहायलासुद्धा बिबा भेटत नाही. ही वस्तुस्थिती बदलणे आवश्यक असल्याचे शेतकरी शरद वामनराव शेळके यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Image may contain: one or more people and people sitting
बिब्बा फोडून गोडंबी काढतानाचे संग्रहित छायाचित्र

हिवाळ्यातील गोडंबीचे महत्त्व
बिब्ब्याची झाडे फारशी शिल्लक राहिली नसल्याने गोडंबीच्या व्यवसायासाठी बिब्बे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आदी राज्यांतून आणावे लागत आहेत. गोडंबी हा सुका मेव्यातील प्रमुख खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे गोडंबीचे दर वर्षभरातील अन्य काळाच्या तुलनेत अधिक राहतात. परंतु, मागणीच्या तुलनेत पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे काही महिने बिब्बे फोडून त्यातून मिळणारी गोडंबी साठवून ठेवली जात असल्याचे व्यावसायिक शेख शब्बीर शेख उस्मान यांनी सांगितले.

Image may contain: 1 person, sitting, child and outdoor
बिब्बा फोडताना अशी घ्यावी लागते काळजी (संग्रहित छायाचित्र)

हे देखील वाचलेच पाहिजेआत्मबळ वाढवल्यास मिळते मानसिक आरोग्य : कसे ते वाचाच

विविध आजारांवर बिब्बा गुणकारी
आयुर्वेदासारख्या औषधी पद्धतीत अनेक औषधी बिब्बा फळांपासून बनविल्या जातात. बिबा वापरण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक असते. फळांचा वापर अस्थमा, कुष्ठरोग, कफ, मेंदूविकार, फीट, सांधेदुखी, घशाचे विकार, मूळव्याध आदी आजारांवर केला जातो. परंतु, अलिकडे बिब्याची झाडे नष्ट होत असल्याने बिबा मिळणेही दुर्मिळ होत चालले आहे.
- डाॅ. कृष्णा कुंभकर्ण (आयुर्वेदाचार्य, औरंगाबाद)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ayurveda, this 'virtuous' tree is becoming rare