आयुष्मान भारत योजनेसाठी गोल्डन कार्ड वितरण मोहीम

माधव इतबारे
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

केंद्र सरकारने आर्थीक दुर्बल कुटुंबांसाठी सुरु केलेल्या "आयुष्यमान भारत' योजनेसाठी शहरात 3 लाख 92 हजार लाभार्थी आहेत. मात्र, महापालिकेच्या चुकांमुळे गेल्या वर्षभरात एकालाही या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले. त्यामुळे महापालिकेने 1 ते 8 सप्टेंबरदरम्यान विशेष मोहीम राबवुन 23 केंद्रातून गोल्डन कार्डसाठीची केवायसी प्रक्रीया पूर्ण करुन कार्ड वितरण केले जाणार असल्याची माहीती महापौरांनी दिली.

औरंगाबाद - केंद्र सरकारने आर्थीक दुर्बल कुटुंबांसाठी सुरु केलेल्या आयुष्यमान भारत योजनेसाठी शहरात 3 लाख 92 हजार लाभार्थी आहेत. मात्र, महापालिकेच्या चुकांमुळे गेल्या वर्षभरात एकालाही या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले. त्यामुळे महापालिकेने 1 ते 8 सप्टेंबरदरम्यान विशेष मोहीम राबवुन 23 केंद्रातून गोल्डन कार्डसाठीची केवायसी प्रक्रीया पूर्ण करुन कार्ड वितरण केले जाणार असल्याची माहीती महापौरांनी दिली.

आयुष्यमान भारत योजनेने लागू होण्यापुर्वीच जगातील सर्वात मोठे विमा कवच असल्याचा नावलौकिक मिळवला. मात्र, 23 सप्टेंबरपासुन सुरु झालेल्या या योजनेला राज्यातील शासकीय रुग्णालयात लागु करण्यात आली. 2011 साली झालेल्या सव्हेक्षणातील कुटुंबांना योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा यातुन मिळणार आहे. मात्र, योजना सुरु होऊन वर्ष सरले. तरी पालिकेच्या आरोग्य विभागावर लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया करण्याची जबाबदारी असताना एकालाही गोल्डन कार्ड मिळाले नाही. त्यामुळे औरंगाबाद शहरात 3 लाख 92 हजार लाभार्थी वंचित राहीले.

यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात सोमवारी (ता. 26) बैठक पार पडली. त्यात योजनेचा लाभ देण्यासाठी पालीकेच्या 23 रुग्णालयात सुविधा केंद्र सुरु करण्याचे ठरले. तसेच नोंदणी प्रक्रियेसाठी लागणारे 30 रुपयांचे शुल्क पालिका भरणार आहे. विविध प्रकारे योजनेची जनजागृती करण्यात येणार आहे. शहरातील लाभार्थ्यांना 1 ते 8 ऑक्‍टोबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या विशेष नोंदणी मोहिमेची माहिती मिळावी यासाठी वार्ड कार्यालये, पालिका मुख्यालय, शाळा, आरोग्य केंद्र, शहरात फिरणाऱ्या पालिकेच्या घंटा गाड्या आणि रिक्षावर ध्वनिफीतीद्वारे आवाहन करण्यात येणार आहे.

तसेच नव्याने नोंदणी प्रक्रिया राबविण्यासाठी सर्व 115 वार्डातील नगरसेवकांच्या कार्यालयात, पालिकेच्या विविध कार्यालयात सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. मात्र, यातून नेमके किती लाभार्थ्यांना कार्ड मिळेल हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For 'Ayushman Bharat' Scheme "Golden Cards' distribution campaign