बाप रे बाप ! कोविड सेंटरमध्ये घुसला साप- डॉक्टर, कर्मचाऱ्यासह रुग्णांचीही तारांबळ

गणेश पांडे | Monday, 26 October 2020

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सोमवारी सकाळी चक्क भला मोठा साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला.

परभणी ः अधिच कोरोनाच्या संसर्गामुळे हैराण झालेल्या परभणीतील कोरोनाग्रस्त सोमवारी (ता.26) एका घटनेने गर्भगळीतच झाले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सोमवारी सकाळी चक्क भला मोठा साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर सर्पमित्रांनी कोविडसेंटरमध्ये जावून सापाला पकडले तेव्हा कुठे कोरोना रुग्णांच्या जीवामध्ये जीव आला.

जिंतूर रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीमध्ये कोविड हॉस्पिटल कार्यान्वित करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्वाधिक खाटांची संख्या असल्याने या ठिकाणी रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. या कोविड सेंटरमध्ये सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास खालच्या मजल्यावर एका कर्मचार्‍यास साप दिसला. कोविंड सेंटरमध्ये साप घुसल्याचे त्यांनी उपस्थित कर्मचारी व डॉक्टरांना सांगितले. पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी रुग्णांच्या कक्षा पर्यंत गेली. मग काय अधिच कोरोना संसर्गामुळे हैराण असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची तर पुरती गाळणच उडाली. अनेक रुग्ण भयभित झाले.  प्रसंगावधान राखून तेथील कर्मचार्‍यांनी तातडीने सर्पमित्रास मोबाईल करून घटनेची माहिती दिली. 

हेही वाचानांदेड : एक तलवार व दोन खंजरसह तिघांना अटक -

या ठिकाणी आता राहिलेल्या 26 रुग्णांवर नेहमीच दडपण असते

सर्पमित्र सौरभ पवार व अभिषेक पुसदकर हे दोन सर्प मित्र तातडीने कोविड सेंटरमध्ये धावत आले. त्यांनी कोविड सेंटरच्या पहिल्या मजल्याच्या पायरीखाली दडून बसलेल्या सापास मोठ्या शिताफीने पकडले. सर्पमित्राने या सापाबद्दल उपस्थित कोरोना ग्रस्त रुग्णांना व तेथील कर्मचाऱ्यांना माहीती दिली. अधिच औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या या इमारतीकडे कुणी सहसा फिरकत नाही. त्यामुळे या ठिकाणी आता राहिलेल्या 26 रुग्णांवर नेहमीच दडपण असते. त्यात आता इमारतीत भला मोठा साप घुसल्याचे कळल्यानंतर तर या सर्व रुग्णांसह तेथे कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच गाळण उडाली. साप पकडून नेल्यानंतर कर्मचाऱ्यासह रुग्णांचा जीवात जीव आला.

येथे क्लिक करा -  कोरोनाच्या सावटाखाली दसरा, परंतू सिमोलंघन नाही

साप पानदिवड जातीचा....

दरम्यान, कोविड सेंटरमधील पकडलेला साप हा पान-दिवड जातीचा असून तो तीन-साडेतीन फुट लांबीचा आहे. हा साप बिनविषारी आहे. मात्र, रागीट साप म्हणून ओळखल्या जातो. बिनविषारी असल्यामुळे त्याला सहजच पकडण्याचा प्रयत्न सहसा करू नये, कारण तो रागीट असल्याने चावा घेतो. शिवाय चावल्यानंतर शरीरास रगडतो. त्यामुळे चावलेला तो घाव मोठा होतो. नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगणे आवश्यक आहे. पाण्यामध्ये आढळणारा हा साप शहरात नालीमध्ये सहसा आढळत असतो.

- सौरभ पवार, सर्पमित्र, परभणी

संपादन - प्रल्हाद कांबळे