आता अध्यक्षपद नको - बाबा भांड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ ज्येष्ठ लेखक-प्रकाशक बाबा भांड यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. लहानमोठे 106 प्रकल्प आणि महत्त्वाकांक्षी योजनांना आकार दिल्यानंतर आता पुन्हा अध्यक्षपद नको असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

औरंगाबाद - महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ ज्येष्ठ लेखक-प्रकाशक बाबा भांड यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. लहानमोठे 106 प्रकल्प आणि महत्त्वाकांक्षी योजनांना आकार दिल्यानंतर आता पुन्हा अध्यक्षपद नको असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

शासनाने तीन वर्षांपूर्वी बाबा भांड यांची मंडळाचे तेरावे अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या; पण मंडळाच्या कार्यकाळात त्यांनी 106 वाङ्‌मयीन प्रकल्प सुरू केले. त्यांचा लेखाजोखा त्यांनी आज पत्रकार परिषदेत मांडला. यातील बृहद्‌ प्रकल्पांमध्ये गुरुवर्य केळूसकर समग्र साहित्याच्या 13 खंडांबरोबरच, होळकरशाहीच्या समग्र इतिहासाचे 11, सूफी तत्त्वज्ञानाचे तीन, अक्षर बालवाङ्‌मयचे पाच, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे पाच, भारतीय ग्रंथालय चळवळीचे दोन, संगीत परंपरेवरील दोन, सयाजीरावांच्या दातृत्वावरील चार खंडांचा समावेश आहे. या तीन वर्षांत मंडळाने 38 नव्या पुस्तकांचे प्रकाशन केले. 31 पुस्तके पुनर्मुद्रणासाठी पाठवली. नवलेखकांना अनुदाने दिली.

सात साहित्य संस्थांना दिले जाणारे वार्षिक अनुदान दहा लाख करण्यात आले. चाकोरीबाहेरील संमेलनांना प्रत्येकी दोन लाख, असे 89 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. 15 लाख रुपये खर्चून 30 विविध कार्यशाळा घेतल्या. लेखक, अनुवादकांच्या मानधनात वाढ केली. केंद्र सरकारच्या "एक भारत, श्रेष्ठ भारत' योजनेत पाच पुरस्कारप्राप्त मराठी पुस्तकांचा उडिया भाषेत अनुवाद करून दिला. शासकीय ग्रंथांवर विक्री सूट 40 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवून ती खासगी विक्रेत्यांनाही उपलब्ध करून दिली.

"साकेत'च्या लेखकांवर अन्याय
मंडळातर्फे लेखक-प्रकाशकांना विविध पुरस्कार दिले जातात; मात्र यात "साकेत' प्रकाशनाचे एकही पुस्तक पुरस्कारासाठी दाखल करू दिले नाही. त्यामुळे अनेक दर्जेदार लेखकांवर अध्यक्ष म्हणून आपल्याकडून अन्यायच झाला, अशी भावना बाबा भांड यांनी बोलून दाखवली; मात्र हा दंडक घालणे गरजेचेच होते. साहित्य आणि संस्कृतीचा नम्र सेवक म्हणून आपण काम केले. आता लेखनात पुन्हा स्वतःला झोकून देणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Baba Bhand Talking