कॉंग्रेसकडून बाबुराव कुलकर्णी यांना उमेदवारी 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जुलै 2019

जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसकडून अंबडचे माजी नगराध्यक्ष भवानीचंद भालंचद्र उर्फ बाबुराव कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

औरंगाबाद : जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसकडून अंबडचे माजी नगराध्यक्ष भवानीचंद भालंचद्र उर्फ बाबुराव कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना बी फॉर्म दिला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार सुभाष झांबड यांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 

औरंगाबाद-जालना विधान परिषदेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून अखेर बाबुराव कुलकर्णी यांनाच पक्षश्रेष्ठींनी पसंती दिली आहे. गेल्या आठवडाभरापासून कॉंग्रेसचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू होती. 

कॉंग्रेसकडून सुभाष झांबड, बाबुराव कुलकर्णी व जालना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ राजाभाऊ देशमुख यांची नावे कॉंग्रेस श्रेष्ठींकडे पाठवण्यात आली होती. 2013 मध्ये ऐनवेळी बाबुराव कुलकर्णी यांना दिलेला बी फॉर्म काढून सुभाष झांबड यांना देण्यात आला होता. सुभाष झांबड यांनी तेव्हा शिवसेनेच्या किशनचंद तनवाणी यांचा पराभव करत विजय मिळवला होता. 

परंतु, आपल्यावर अन्याय झाल्याची भावना बाबुराव कुलकर्णी व त्यांच्या मनात घर करून होती. यावेळी विधान परिषदेची निवडणुक लढवण्यची इच्छा व्यक्त केल्यानंतर पुन्हा सुभाष झांबड त्यांच्यासाठी अडसर ठरतात की काय? अशी चर्चा होती. औरंगाद जिल्ह्यातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांच्या गांधी भवनात झालेल्या बैठकीत देखील झांबड यांच्यासाठी आग्रह धरण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baburao Kulkarni will be the candidate from Congress