आरोग्य केंद्राने रेफर केले अन् रस्त्यातच तिचे बाळ दगावले!

शेख मुनाफ 
Saturday, 21 November 2020

आडूळ येथील प्रकार : आरोग्य केंद्रात नव्हता एकही डॉक्टर हजर.
जन्माआधीच बाळाच्या मृत्यूला निष्क्रीय आरोग्य यंत्रणा ठरली कारणीभूत. 
नातेवाईकांनी केला आरोप.   

आडूळ ( औरंगाबाद) : प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या २७ वर्षीय महिलेला लवकर उपचार न मिळाल्याने घाटी रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच तिच्या पोटातील बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. २०) रात्री घडली. प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर नसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पैठण तालुक्यातील वडवाळी येथील ललिता नंदू गायकवाड या काही दिवसांपासून माहेरी आडूळ येथे बाळंतपणासाठी आल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्यांना प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्याने आई व भावाने सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु, या ठिकाणी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एकही वैद्यकीय अधिकारी आणि इतर कोणताच कर्मचारी (एक शिपाई वगळून) उपस्थित नसल्याने तब्बल एक तासभर जागेवर उपचाराविना पडून होती. याची माहिती रात्रपाळीच्या ड्युटीवर असलेल्या एका आरोग्य सेविकेला कळताच तीच्या घरून घाईघाईने प्राथमिक आरोग्य केंद्रात आली खरी; परंतु त्या आरोग्य सेविकेने कोणत्याही प्रकारची तपासणी वा प्रसूती न करता सरळ चक्क त्या महिलेच्या नातेवाईकांना रेफर पत्र देऊन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवून दिले. रस्त्यामध्येच ललिताबाईच्या पोटातील बाळ दगावले. सध्या त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आरोग्य केंद्र बनले ‘रेफर सेंटर’ 
आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील ५० गावातील रुग्ण उपचारासाठी तसेच कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया/बाळंतपणासाठी मोठ्या संख्येने महिला येथे येतात. याला आडूळ खुर्द, कडेठाण, एकतुनी, अंतरवाली खांडी, गेवराई आगलावे ही उपकेंद्रे संलग्न असून रुग्णांच्या सेवेसाठी तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. परंतु या तिन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एकही मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करित खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. इतर कर्मचाऱ्यांचीसुद्धा ‘कधी ही या आणि केव्हाही घरी ज’ अशी परिस्थिती आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्रामसभेत ठराव घेऊ 
शेख शमीम नासेर (सरपंच आडूळ) : यापूर्वी देखील ग्रामपंचायतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या वारंवार लेखी सुचना दिल्या. तरी सुद्धा ते मुख्यालयी राहत नसल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी रुग्णांकडून ग्रामपंचायत कार्यालयात प्राप्त होत आहेत. आता ग्रामसभेत ठराव घेणार आहोत. 

 

‘‘प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पोटातील बाळाने पोटातच शौच केल्याने रुग्ण अतिगंभीर असल्या कारणाने तिला येथून रेफर करण्यात आले.’’ 
- डॉ. निळकंठ चव्हाण (वैद्यकीय अधिकारी, आडूळ) 

‘‘येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळी जेव्हा माझ्या बहिणीला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले तेव्हा कोणताच वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे तिला लवकर उपचार मिळाले नाही. तासभर ती उपचाराविना पडून होती. या गंभीर प्रकरणाची मी आरोग्य उपसंचालक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळेच बाळाचा मृत्यू झाला. 
-अनिल बनकर, महिलेचा भाऊ 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baby died mothers womb due to lack treatment Shocking incident Aadul news