तिघा बहिणींचा नदीत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

बदनापूर (जि. जालना) - कस्तुरवाडी (जि. जालना) येथील लहुकी नदीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या तीन बहिणींचा रविवारी (ता. 24) बुडून मृत्यू झाला. मृत मुलींमध्ये दोन सख्ख्या बहिणी असून, तिसरी आतेबहीण आहे.

बदनापूर (जि. जालना) - कस्तुरवाडी (जि. जालना) येथील लहुकी नदीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या तीन बहिणींचा रविवारी (ता. 24) बुडून मृत्यू झाला. मृत मुलींमध्ये दोन सख्ख्या बहिणी असून, तिसरी आतेबहीण आहे.

कस्तुरवाडी शिवारात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने लहुकी नदी दुथडी भरून वाहत आहे. आज सकाळी गजाला मोईन शेख (वय 19), सुरैया मोईन शेख (18), सायमा जुम्माखान पठाण (18) आणि तर अन्य एक तरुणी (सर्व रा. कस्तुरवाडी, ता. बदनापूर) नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यापैकी गजाला, सुरैया व सायमा या तिघींचा बुडून मृत्यू झाला. तिन्ही मृत तरुणी शेतमजूर कुटुंबातील आहेत. गजाला ही विवाहित होती, तर तिची धाकटी बहीण सुरैयाचे लग्न ठरले होते. तिसरी सायमा ही त्यांची आतेबहीण होती.

जलयुक्‍त शिवार योजनेअंतर्गत नदीचे खोलीकरण झाले होते. त्यामुळे पाणीपातळी 20 फुटांपेक्षा अधिक होती. कपडे धुताना एका तरुणीचा पाय घसरला. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात अन्य दोन तरुणीही बुडाल्या. त्यांच्या बरोबर असलेल्या चौथ्या तरुणीने गजाला, सुरैया आणि सायमा या तिघींना वाचविण्याच्या प्रयत्न केला. मात्र, ती काठावर पडल्यामुळे ती वाचली. बचावलेल्या तरुणीने आरडाओरड केल्याने ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. त्यांनीही या मुलींला वाचविण्याचा प्रयत्न केला. यात सायमा हिला जिवंत बाहेर काढण्यात आले. मात्र, वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन बारी, पोलिस निरीक्षक रामेश्‍वर खनाळ यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: badnapur jalana news three sisters death in drown