दागिन्यांसह सापडलेली पैशांची बॅग केली परत 

बाबासाहेब गोंटे
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

अंबड : योगिता कळकटे यांचा प्रामाणिकपणा 

अंबड (जि.जालना) - मत्स्योदरी देवीच्या दर्शनासाठी गुरुवारी (ता. 3) रात्री गेलेल्या एका महिलेची तब्बल पाच तोळे सोन्याचे दागिने आणि सतरा हजार रुपयांची रक्‍कम असलेली बॅग हरवली. दरम्यान, देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या योगिता कळकटे यांना ती सापडली. त्यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत ही बॅग संबंधितांना परत दिली. 

शहरातील एसटी आगारातील योगेंद्रसिंह चव्हाण यांच्या पत्नी सीमा चव्हाण या मुले व मैत्रिणीसह गुरुवारी (ता.3) रात्री सात वाजेच्या दरम्यान मत्स्योदरी देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. मात्र गर्दीतच त्यांच्याजवळील पाच तोळे सोन्याचे दागिने आणि सतरा हजार रक्‍कम असलेली बॅग कुठेतरी पडली. दरम्यान, यात्रेत खरेदी करण्यासाठी मुलाबरोबर योगिता राजेंद्र कळकटे या गेल्या होत्या. तेव्हा यात्रेत रस्त्यावर त्यांच्या पायाला ही बॅग लागली. बॅगेतील काही नोटा त्यांना दिसल्या. जवळील कुणाला विचारावे का, असा प्रश्‍न योगिता यांना पडला. मात्र नंतर बॅगच्या शोधात कुणी येते का ते पाहावे म्हणून त्या वाट पाहू लागल्या. मात्र बराच वेळ तसे कोणी आले नाही. त्यामुळे त्यांनी बॅगमध्ये मोबाईल क्रमांक, ओळख पटविण्यासारखे काही मिळते का, याचा शोध घेतला. तेव्हा बॅगमध्ये पवार यांचा मोबाईल क्रमांक दिसून आला. घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व अंबडचे रहिवासी ज्ञानेश्‍वर पवार यांचा मोबाईल क्रमांक आढळला. योगिता यांनी त्यांना फोन लावून बॅगविषयी पुसटशी माहिती दिली. मात्र त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. याच कालावधीत यात्रेतून भयभीत झालेल्या सीमा चव्हाण या अन्य एकीसह काहीतरी शोध घेत असल्याचे योगिता यांच्या लक्षात आले. चौकशी केली असता त्यांनी बॅग हरवल्याचे सांगितले. त्यावर ज्ञानेश्‍वर पवार हे आपले नातेवाईक असल्याचेही चव्हाण यांनी सांगितल्यानंतर योगिता यांना ओळख पटली. त्यांनी दागिने व पैशाची बॅग तत्काळ चव्हाण यांना परत केली. बॅग परत मिळताच चव्हाण यांचे डोळे भरून आले.

दरम्यान, ठाकूरनगरमधील विठ्ठल-रखुमाई मंदिरात शुक्रवारी रात्री योगिता कळकटे यांचा कल्पना ठाकूर, जामदरे, इंदुमती घुगे आदींसह महिलांनी सत्कार केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bag return to woman