"वंचित आघाडी'ला जागा दिल्यास माघार - ओवेसी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

नांदेड - कॉंग्रेसने ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला समाधानकारक जागा देत सन्मानपूर्वक युती केली, तर "एमआयएम' महाराष्ट्रात निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा "एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली. संविधान वाचविण्यासाठी ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करा, असे आवाहनही त्यांनी केले.

नांदेड - कॉंग्रेसने ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला समाधानकारक जागा देत सन्मानपूर्वक युती केली, तर "एमआयएम' महाराष्ट्रात निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा "एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली. संविधान वाचविण्यासाठी ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करा, असे आवाहनही त्यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीतर्फे नवीन मोंढा मैदानावर गुरुवारी (ता. 17) झालेल्या सत्ता संपादन महामेळाव्यात खासदार ओवेसी बोलत होते. या वेळी ऍड. प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित होते. ओवेसी म्हणाले, ""देशातील दलित, मुस्लिम आणि ओबीसींचा वापर आजपर्यंत फक्त निवडणुकीपुरता झाला. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे होऊन गेली, तरी आजही वंचित समाज वंचितच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे राहुल गांधी आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी आश्‍वासनांशिवाय काहीच दिले नाही. त्यांची कूटनीती ओळखली पाहिजे. तेलंगणात सर्व जण आले, मात्र त्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. सध्या महाराष्ट्रात ऍड. प्रकाश आंबेडकर हे एकटेच वंचितांसाठी लढत आहेत. त्यांना साथ देणे हे कर्तव्य, भाग्य समजतो. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम समाजावर फार मोठे उपकार केले आहेत. त्यांची परतफेड करण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत.''

न्याय मिळायला हवा
महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी मी आलो आहे. मला निवडणुका लढायच्या नाहीत. कुठलीच अपेक्षा नाही, परंतु वंचित समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आहे. कॉंग्रेसला "एमआयएम' चालत नसेल, तर मी मोठे मन करून एकही जागा लढणार नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीने मागितलेल्या जागा सोडाव्यात, अशी मागणी ओवेसी यांनी केली. मुस्लिमांनीही कॉंग्रेस व भाजपच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

संघावर टीका
ऍड. आंबेडकर म्हणाले, 'देशात सध्या मनुवादी सरकार आहे. "आरएसएस'कडून देशात सांस्कृतिक राष्ट्रवाद येऊ घातला आहे. या सांस्कृतिक राष्ट्रवादाला देशाचे काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त देश हा संस्कृतीवर चालणारा असावा, असे वाटते. राज्यातील बॉम्बस्फोटातील आरोपी हे सर्वाधिक "आरएसएस'चे कार्यकर्ते असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. पोलिसांनी नागपूर येथे रेशीमबाग परिसरात जर छापे टाकले, तर त्यांना घातक हत्यारे सापडतील. पोलिसांनी फक्त हिंमत दाखवावी.''

Web Title: Bahujan Aghadi MIM asaduddin owaisi Politics