लातुरात मूकमोर्चातून बहुजनांचा एल्गार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

लातूर - ऍट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, "ओबीसी आरक्षण बचाव' या प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील बहुजन समाजाने मंगळवारी एल्गार केला. दलित, ओबीसी, भटकेविमुक्त, मुस्लिम, आदिवासी आदी समाजातील नागरीकांनी स्वाभिमान संघर्ष महामूकमोर्चा काढला. या मोर्चात महिला, मुलींची संख्या लक्षणीय होती. वेगवेगळ्या समाज घटकांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

स्वाभिमानी संघर्ष महामूकमोर्चाची गेल्या दीड महिन्यापासून तयारी सुरू होती. ठरल्याप्रमाणे सकाळपासूनच क्रीडासंकुलाच्या मैदानावर मोर्चेकरी दाखल होऊ लागले. मोर्चेकऱ्यांच्या हाती निळे, भगवे, पिवळे झेंडे होते. बौद्ध धर्माचे भदंत व पाच युवतींच्या हस्ते मशाल पेटवून दुपारी दोनच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली. मोर्चात अग्रभागी भदंत रेवत बोधी, शीलरत्न, भंते नागसेन बोधी, संघप्रिय, महेंद्र बोधी आदी होते. "जय भीम', "नवे पर्व ओबीसी सर्व' अशा आशयाच्या टोप्या घातलेले मोर्चेकरी लक्ष वेधून घेत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चातील तरुणींनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन दिले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था होती. मोर्च्याच्या नियोजनासाठी हजार स्वंयसेवक होते. काही तरुण वॉकीटॉकीवरून नियोजन करीत होते, मार्गदर्शनपर सूचना देत होते. या मोर्चाच्या माध्यमातून बहुजन समाजाने आपल्या मागण्यांसाठी एल्गार केल्याचे चित्र शहरात दिसून आले. 

मोर्चातील क्षणचित्रे 

- शिस्तबद्ध मोर्चा 

- स्वयंसेवकांकडून वॉकीटॉकीद्वारे मार्गदर्शन 

- मोर्चेकऱ्यांच्या हाती निळे, भगवे, पिवळे झेंडे 

- निळ्या फेट्यांतील तरुण लक्षवेधी 

- मोर्चेकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था 

- तरुणींकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Web Title: Bahujan Kranti muk morcha in latur