
अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चांगल्या विनियोगासाठी बजाज ही मदत करत असल्याचे यावेळी बजाजचे विश्वस्त सी. पी. त्रिपाठी यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. निधीचा विषय नसून चांगली उपयुक्त वास्तू उभारणे, त्याची वैद्यकीय विद्यार्थ्यांसह समाजाला मदत करण्याचा हेतू असल्याचे त्रिपाठी म्हणाले.
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या जागा दीडशेवरून दोनशे झाल्या. पीजी सीट्सही वाढत असल्याने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकनानुसार आवश्यक असलेली व्याख्यान कक्षांची स्वतंत्र इमारत बजाज ऑटो कंपनी सीएसआर फंडातून बांधून देत आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.27) घाटीत प्रत्यक्ष स्थळपाहणी केली. शिवाय या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर चर्चाही केली.
अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चांगल्या विनियोगासाठी बजाज ही मदत करत असल्याचे यावेळी बजाजचे विश्वस्त सी. पी. त्रिपाठी यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. निधीचा विषय नसून चांगली उपयुक्त वास्तू उभारणे, त्याची वैद्यकीय विद्यार्थ्यांसह समाजाला मदत करण्याचा हेतू असल्याचे त्रिपाठी म्हणाले.
यासाठी अंदाजे सहा ते सात कोटींचा खर्च अपेक्षित असून, तळमजल्यासह चार मजल्यांची ही इमारत असेल. शिवाय सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा, अडीचशे विद्यार्थ्यांचे एक असे चार व्याख्यान कक्ष या इमारतीत असतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
कार्यालयीन कागदपत्र पूर्तता व राज्य शासनाची मान्यता लवकर मिळवण्यासाठी बैठकीत चर्चा झाल्याचे अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी सांगितले. यासाठी घाटीतील बहुतांश माजी विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने एवढी मदत मिळणे शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या.
केली सविस्तर चर्चा
उपस्थितांनी झुणका भाकर केंद्रामागच्या जागेची पाहणी करून अधिष्ठाता दालनात झालेल्या बैठकीत अडचणींची चर्चा केली. यावेळी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अनिल भंडारे, रणधीर पाटील, बजाज ऑटोचे मुकुंद बडवे, बजाज सीएसआर कार्यालयाचे चंद्रशेखर दीक्षित, फर्स्ट आयडिया आर्किटेक्टचे गौरव कारवा, सुनील देशमुख, उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. सुधीर चौधरी, डॉ. ज्योती बजाज, डॉ. भारत सोनवणे, डॉ. अनिल वाघमारे, डॉ. एस. पी. लोखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील चौधरी, अमिषा वाघमारे, कदीर अहेमद, के. एम. आय. सय्यद आदींनी स्थळपाहणी करत प्रत्यक्ष इमारतीचे बांधकाम, ठोबळ नकाशे, त्यातील तरतुदी यावर सविस्तर चर्चा केली.