कमलनयन बजाज रुग्णालयात होईल हृदय प्रत्यारोपण!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

औरंगाबाद - आतापर्यंत औरंगाबादेत केवळ किडनी प्रत्यारोपण करणे शक्‍य होते. आता हृदय प्रत्यारोपण करण्याचीही परवानगी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून बीड बायपास येथील कमलनयन बजाज रुग्णालयाला मिळाली आहे. त्यामुळे लवकरच औरंगाबादेत हृदय प्रत्यारोपणही या ठिकाणी होईल, अशी माहिती रुग्णालयाचे हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अजित भागवत आणि सीईओ डॉ. वेंकट होळसांबरे यांनी बुधवारी (ता. 14) "सकाळ'शी बोलताना दिली.

औरंगाबाद - आतापर्यंत औरंगाबादेत केवळ किडनी प्रत्यारोपण करणे शक्‍य होते. आता हृदय प्रत्यारोपण करण्याचीही परवानगी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून बीड बायपास येथील कमलनयन बजाज रुग्णालयाला मिळाली आहे. त्यामुळे लवकरच औरंगाबादेत हृदय प्रत्यारोपणही या ठिकाणी होईल, अशी माहिती रुग्णालयाचे हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अजित भागवत आणि सीईओ डॉ. वेंकट होळसांबरे यांनी बुधवारी (ता. 14) "सकाळ'शी बोलताना दिली.

कमकुवत हृदय असणाऱ्या रुग्णांसाठी हृदय प्रत्यारोपण हा एकमेव उपाय शिल्लक राहतो. ही सुविधा आतापर्यंत मराठवाड्यात उपलब्ध नव्हती. त्यासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागायची. आता त्यांच्यासाठी बजाज रुग्णालयात सुविधा उपलब्ध झालेली आहे. डॉ. भागवत म्हणाले, की कमलनयन बजाज रुग्णालयाला हार्ट ट्रान्सप्लान्ट, म्हणजेच हृदय प्रत्यारोपणासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे. रुग्णालयात डॉक्‍टर, उपकरणे, अतिदक्षता विभाग, प्रयोगशाळा आदी सुविधा अद्ययावत उपलब्ध असल्याने राज्य सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने हृदय प्रत्यारोपणासाठी रुग्णालयाने पाठविलेल्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला. आता यकृत प्रत्यारोपणाची परवानगी मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच त्याला मान्यता मिळण्याची शक्‍यता आहे.

डॉ. होळसांबरे म्हणाले, की हृदयाच्या पम्पिंगचे कार्य व्यवस्थित न होणाऱ्या व ज्यांना प्रत्यारोपणाची गरज आहे, अशा रुग्णांना नोंदणी करता येणार आहे. प्रत्यारोपणानंतर रुग्णांची काळजी घेण्यासाठी या क्षेत्रात अनुभवी हृदयरोगतज्ज्ञाची आवश्‍यकता असते. प्रत्यारोपण झाल्यानंतर दर काही कालावधीनंतर हृदयाचा छोटासा अंश बायोप्सी तपासणीसाठी पाठवावा लागतो. ही बायोप्सी करण्याचा अनुभव असलेले डॉ. अजित भागवत हे औरंगाबादमधील एकमेव हृदयरोगतज्ज्ञ आहेत. अमेरिकेत असताना मिळालेल्या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी 150 हून अधिक बायोप्सी केल्या आहेत. सुरवातीच्या काही रुग्णांमध्ये प्रत्यारोपणाचा खर्च पेलण्यासाठी बजाज समूहातर्फे मदत करण्यात येईल. हृदयाच्या प्रत्यारोपणासंबंधी समुपदेशन करण्यासाठी एक स्पेशल सेल बजाज रुग्णालयात लवकरच सुरू होईल.

या सुविधानंतरच मिळते परवानगी...
हृदय प्रत्यारोपणासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे पथक पाहणी करते. यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, हृदय शल्यचिकित्सक, अतिदक्षता पथक, एक्‍स्ट्रा कॉर्पोरिअल मेम्ब्रेन ऑक्‍सिजनेटर, हार्टलंग मशीन व अन्य उपकरणे, प्रयोगशाळा, क्ष-किरण विभाग आदी सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहेत की नाही, याची तपासणी होते. त्या मानांकनानुसार उपकरणे आणि तज्ज्ञांची टीम असेल तरच हृदय प्रत्यारोपणाची परवानगी रुग्णालयाला दिली जाते. आरोग्य विभागाच्या पथकामध्ये सर्जन, कार्डिओलॉजिस्ट आणि सिव्हिल सर्जन अशी टीम असते. परवानगी मिळाल्यानंतर संबंधित रुग्णालयाकडून रुग्णांची यादी झोनल ट्रान्स्प्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटीकडे पाठविण्यात येते. त्यानंतर ज्यांचा क्रमांक येईल. त्यानुसार हृदयदाता मिळाल्यानंतर हृदय प्रत्यारोपण करता येते.

Web Title: Bajaj will kamalnayan hospital heart transplant!