प्रसंगी राजकीय सत्तेवर सीलिंग आणा; मात्र मराठा समाजाला हक्‍क द्या

smore
smore

औरंगाबाद -  "एक प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या, म्हणजे समस्त महिलांना सत्ता मिळाली असे नव्हे. तुम्हाला राजकीय सत्तेवर सीलिंग आणायची तर खुशाल आणा, मुख्यमंत्रिपदावरही आरक्षण आणा. ज्या समाजाचे राज्यकर्ते होते, त्यांच्यामुळे समाजाला काय फरक पडला,' असा प्रश्‍न ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी उपस्थित करतानाच "समाजाचे दीर्घकाळ राज्यकर्ते होते,' असे म्हणून बांधवांना काहीच द्यायचे नाही, हे चुकीचे आहे, असेही स्पष्ट केले.

सहकारमहर्षी, लोकनेते बाळासाहेब पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त संत एकनाथ रंगमंदिर येथे गुरुवारी (ता. 24) डॉ. मोरे यांचे "मराठा समाजाचा बहुजनवाद' या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. "मराठा कुणाला म्हणायचे, हे सांगता आले पाहिजे. साधी राहणी, स्वार्थापलीकडे पाहू शकणारा, ज्याला सत्याची चाड आणि अन्यायाची चीड असते तो मराठा. मराठे हे कुणी युद्धखोर नव्हते, शांततेच्या काळात शेती करीत; मात्र कुणी आक्रमण केले तर तलवारी काढत. पहिल्यापासून त्यांची ठेवण तशीच असे. त्यांचे समर्थकदेखील त्या पद्धतीने वागत असत. जो शेती करतो, तो कुणबी, हे जोतीराव फुले यांनीच सांगितलेले आहे. तसेच शिक्षणात, नोकरीत मराठा समाजाला आरक्षण हवे, अशी पहिली मागणी फुले यांनीच केलेली आहे.' आरक्षण हे कायम जात म्हणून दिलेले नाही. ज्या जातीचे मागासलेपण संपेल, ते त्यातून बाहेर येतील. जर ते मराठा समाजाच्या बाबतीतही घडले तर तेदेखील त्यातून बाहेर पडतील, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दीर्घकाळ मराठा राज्यकर्ते होते, त्यामुळे समाजाला काय फरक पडला हे विचारात घ्यायला हवे. जातीय पद्धतीने नेमणुका झाल्या असत्या, तर आम्ही कुठे तरी कुलगुरू असतो, असेही त्यांनी मिश्‍किलपणे म्हटले.

इतरांना दिल्याशिवाय आपल्याला नको, हाच खरा बहुजनवाद आहे. समाजाने कायम इतरांची पर्वा केली असून, ते राज्यकर्ते होते; म्हणून त्यांच्या बांधवांना काहीही देता येणार नाही, हेच मुळाच चुकीचे असल्याची टिप्पणी त्यांनी केली.

शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी खऱ्या अर्थाने बहुजनांसाठी कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोनवेळा गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा मराठा समाजात अंगभूत गुण आहे. गावगाड्यात पाटीलकी ही समाजाने लादलेली नव्हे, तर स्वीकारलेली लीडरशिप आहे. त्या काळी कुणबीऐवजी मराठा असे सांगायला सुरवात केली गेली. ती एक वेगळी सोय होती. त्यामुळे अचानकपणे कुणबी कमी झाले आणि मराठा संख्या वाढली.''

अध्यक्षीय समारोपात डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, ""बहुजनवादाचे मूळ "बहुजन हिताय बहुजन सुखाय' यात आहे. मराठा समाजाने राष्ट्रीय संस्था उभ्या करण्याचे काम केले.'' सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचे काम मराठा समाज करीत आला असून, ते त्याच्या डीएनएमध्येच असल्याचे गव्हाणे यांनी नमूद केले. ऍड. डी. आर. शेळके यांनी प्रास्ताविकात बाळासाहेब पवार यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. बाळासाहेब पवारांनी मराठवाड्यात सहकाराचे जाळे विणून समाजाला खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. सूत्रसंचालन रूपेश मोरे यांनी केले. या वेळी एमजीएमचे अंकुशराव कदम, उद्योजक मानसिंग पवार, मंगलसिंह पवार, रा. रं. बोराडे, विजय अण्णा बोराडे, बाबा भांड, भाऊसाहेब राजळे, माजी आमदार नामदेव पवार, ऍड. प्रदीप देशमुख आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com