बाळासाहेबांचा योग्य सन्मान राखू - छगन भुजबळ

बाळासाहेबांचा योग्य सन्मान राखू - छगन भुजबळ

औरंगाबाद - बाळासाहेब आंबेडकरांचा योग्य सन्मान राखल्यास आम्ही निवडणुका लढवणार नाही, ही एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींची भूमिका सकारात्मक आहे. आता ऍड. आंबेडकरांचा सन्मान कसा राखायचा, यावर आम्ही चर्चा करू. कॉंग्रेससह सर्वच समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत दिली. 

भुजबळ म्हणाले, ""आज देशात कुणाला बोलू, लिहू दिले जात नाही. दाभोलकर, पानसरे, सीबीआय प्रकरणात न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. वर्ष 2014 मध्ये मोदी विकास-विकास करीत होते; मात्र नंतर मंदिर-मशीद, मराठा विरुद्ध दलित असे चित्र उभे केले जात आहे. देशात आणीबाणी नव्हे, तर महाआणीबाणी सुरू आहे. त्यामुळे एकत्र येऊन लढा दिला नाही तर देशाला भवितव्य उरणार नाही, असेही ते म्हणाले. समुद्रातील शिवस्मारकाच्या कामावर न्यायालयाने बंदी घातली आणि डान्स बारवरची उठवली. त्यामुळे या राज्यात नेमकं काय चाललंय? याबद्दल भुजबळांनी आश्‍चर्य व्यक्त केले. यावेळी भारिपचे आमदार बळिराम शिरसकर, माजी आमदार हरिभाऊ भदे, बापूसाहेब भुजबळ, अमित भुईगळ, मनोज घोडके उपस्थित होते. 

दरम्यान, भारिपच्या नेत्यांनी रविवारी एका हॉटेलात बंद दाराआड भुजबळ यांच्यासोबत बैठक घेतली. श्री. भुजबळ स्वतः नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवार राहिल्यास त्यांना वंचित आघाडीचा पाठिंबा राहील. त्यांच्या विरोधात उमेदवार दिला जाणार नाही, असा प्रस्ताव या बैठकीत श्री. भुजबळ यांना देण्यात आला. मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीचा कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचे वंचित आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. 

ठाकरे चित्रपट बघायला आवडेल 
शिवसेनेत असताना पंचवीस वर्षे बाळासाहेबांना मी जवळून पाहिलंय. त्यांच्यासोबत राहिलो. आता त्यांच्या जीवनावर "ठाकरे' चित्रपट येतोय. यातील अभिनेत्याने बाळासाहेबांची भूमिका कशी वठवली, हे पाहण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे परिवर्तन यात्रा आणि इतर कार्यक्रमांतून वेळ मिळाला तर चित्रपट बघायला आवडेल, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com