शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी थेट दिल्ली, लखनौमधून निविदा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

तपासणीनंतर अंतिम निर्णय 
तिसऱ्यांदा जून महिन्यात नव्याने निविदा प्रक्रिया राबविली गेली. यावेळी मात्र दोन एजन्सीकडून प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या दोन्ही निविदा महाराष्ट्रातील नसून थेट नोएडा, गुरुग्राम व लखनौ या परराज्यातून आल्या आहेत. एसकेसी इन्फ्रा प्रोजेक्‍ट गुडगाव व डिझाईन फॅक्‍टरी इंडिया प्रा. लि. नोएडा या दोन एजन्सीने एक, तर सिद्धार्थ इंजिनिअरिंग लखनौ व इन्फ्रा पॉवर दिल्ली यांनी एक अशा दोन निविदा भरल्या आहेत. तांत्रिक आणि आर्थिक बाजू तपासल्यानंतर त्या अंतिम केल्या जाणार आहेत.

औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुमारे ४८ कोटी रुपये खर्च करून स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र तिजोरीत खडखडाट असल्यामुळे महापालिकेच्या या निविदेला प्रतिसाद मिळत नव्हता. तिसऱ्यांदा काढलेल्या निविदेला आता थेट दिल्ली नोएडा, लखनौ येथील कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही मराठी कंत्राटदार समोर न आल्याने खंत व्यक्त होत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर म्हणून औरंगाबाद ओळखले जाते. मुंबई, ठाणे, नाशिक नंतर शिवसेनेला सर्वाधिक यश मिळाले ते याच शहरात. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा अशा सगळ्याच निवडणुकीत येथील जनतेने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले. बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी आपल्या जाहीर सभांमधून याचा उल्लेखही केलेला आहे. त्यामुळेच बाळासाहेबांचे स्मारक इथे असावे अशी सर्वसामान्यांची इच्छा होती. सिडको परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात १७ एकर जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि स्मृतिवन विकसित करण्याचा निर्णय महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने घेतला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्मारकाचा आराखडा अंतिम केल्यानंतर ४८ कोटी ३७ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी स्मारकासाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला असला तरी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे एकही कंत्राटदार काम करण्यास धजावला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thackeray Monument Tender Delhi Lucknow