ज्ञानेश्‍वरीची सर्वांत जुनी प्रत औरंगाबादच्या बलवंत वाचनालयात

संकेत कुलकर्णी
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या (भावार्थ दीपिका) लिखाणाला आज 729 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर सर्वांत जुन्या प्रसिद्ध बलवंत वाचनालयानेही शताब्दीवर्षात पदार्पण केले आहे. ज्ञानेश्‍वरीच्या उपलब्ध हस्तलिखित प्रतींपैकी सर्वांत जुनी प्रत या वाचनालयात जतन करून ठेवलेली आहे.

औरंगाबाद : संत ज्ञानेश्‍वरांनी लिहिलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीच्या उपलब्ध हस्तलिखित प्रतींपैकी सर्वांत जुनी प्रत शहरातील बलवंत वाचनालयात जतन करून ठेवलेली आहे. शके 1568 म्हणजे, इसवी सन 1646 साली लिहिली गेलेली ही हस्तलिखित प्रत इतिहास संशोधक न. शे. पोहनेरकर यांच्या संग्रहात होती. हजारो दुर्मिळ आणि मौल्यवान ग्रंथांनी समृद्ध अशा ग्रंथालयाचे ही ज्ञानेश्‍वरी जणू भूषणच आहे. 

शालिवाहन शके 1212, अर्थात इसवी सन 1290 साली नेवासे गावातील मंदिरात एका खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर भाष्य केले, तेच "भावार्थदीपिका' अर्थात "ज्ञानेश्‍वरी' या नावाने अजरामर झाले आहे. कालांतराने हस्तलिखित प्रतींमध्ये येत गेलेली अशुद्धता दूर करून संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण केले. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ 250 वर्षांनंतर शके 1506, म्हणजेच इसवी सन 1584 मध्ये एकनाथांनी हे काम केले आणि महाराष्ट्राला या ग्रंथाची नव्याने ओळख करून दिली. छपाईतंत्राअभावी हस्तलिखित ग्रंथलेखनाच्या या काळातही पुढे ग्रंथाच्या प्रती लिहिताना अनेक अशुद्धी येत गेल्या. 

पुढे 1908-09 साली इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी ज्ञानेश्वरीची जुनी प्रत शोधून तिचे व्याकरण सिद्ध केले. राजवाडे संशोधन मंदिर संग्रहातील प्रतीचा काळ शके 1604 म्हणजेच इसवी सन 1682 आहे. त्याच्याही पूर्वीची शके 1568 असा वर्षाचा स्पष्ट उल्लेख असलेली संपूर्ण प्रत बलवंत वाचनालयात जतन करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर शके 1730 म्हणजे, इसवी सन 1808 साली लिहिली गेलेली आणखी एक सुंदर हस्तलिखित प्रत येथे पाहायला मिळते. 

न. शे. पोहनेरकर यांच्या संग्रहातून... 

प्रसिद्ध इतिहास संशोधक, पुरातत्वज्ञ आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या न. शे. ऊर्फ दादासाहेब पोहनेरकर यांनी मराठवाडाभर फिरून अनेक हस्तलिखिते, ताम्रपट आणि दस्तऐवज गोळा केला. त्यातून या प्रदेशाच्या उज्ज्वल इतिहासाचा उलगडा करण्यास मोठी उभारी मिळाली. पोहनेरकर यांच्या पश्‍चात त्यांचा हस्तलिखितांचा संग्रह बलवंत वाचनालयात जतन करण्यात आला आहे. या ज्ञानेश्‍वरीच्या प्रती त्याच संग्रहाचा भाग आहेत. त्यापैकी ही जुनी प्रत पोहनेरकरांना रामतीर्थ (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील श्री हरिशास्त्री महाराज यांच्याकडून इ. स. 1964 ला मिळाली होती, अशी माहिती माजी ग्रंथपाल आणि पोहनेरकर यांच्या कन्या प्रतिभा जोशी यांनी दिली. 

शास्त्रीय संवर्धनाची योजना 

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या (भावार्थ दीपिका) लिखाणाला आज 729 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर सर्वांत जुन्या प्रसिद्ध बलवंत वाचनालयानेही शताब्दीवर्षात पदार्पण केले आहे. लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ 1920 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या ग्रंथालयात शेकडो हस्तलिखित ग्रंथ जतन करून ठेवण्यात आले आहेत. त्यांचे वेळोवेळी उपलब्ध साधनांच्या आधारे जतन करण्यात आले. या ग्रंथांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याची वाचनालयाची योजना असल्याचे डॉ. सुभाष झंवर यांनी सांगितले. वाचनालयाच्या समृद्ध वारशाचा वाचकांनी लाभ घ्यावा आणि शताब्दी वर्षातील विविध उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रंथपाल आशा कोरान्ने यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balwant Wachanalaya preserved oldest Dnyaneshwari Manuscript