आमदार बंब, चव्हाण यांच्यात कलगीतुरा

jayakwadi dam water
jayakwadi dam water

औरंगाबाद - जायकवाडीच्या हक्‍काच्या पाण्यासोबतच समन्यायी पाणी वाटप व्हावे, यासाठी सोमवारी (ता. २२) तापडिया नाट्यमंदिर येथे सर्वपक्षीय बैठक झाली. यात आमदार सतीश चव्हाण आणि आमदार प्रशांत बंब यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. ‘‘कायद्याप्रमाणे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडीत सोडायलाच हवे; मात्र तसे होत नसल्याने भीक मागणे बरे आहे का?’’ असा सवाल करीत ‘‘अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनविण्यापेक्षा संबंधित मंत्र्यांना आदेश द्यायला सांगावेत,’’ अशी सूचना चव्हाण यांनी केली. त्यावर बंब म्हणाले, ‘‘खरे तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीच आपले पाणी अडविले.’’ हे विधान ऐकून आमदार चव्हाण यांनी पुन्हा माईकचा ताबा घेत ‘‘तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात, चर्चा कशाला, निर्णय घ्यायला सांगा,’’ असा टोला लगावला.

सुरवातीला आमदार बंब यांनी प्रोजेक्‍टरच्या माध्यमातून ऊर्ध्व भागातील धरणातील पाणीपातळी, आपल्या हक्‍काचे अडवून ठेवलेले पाणी, भविष्यात अन्य प्रकल्पांतून सात टीएमसी पाणी कसे आणता येईल, याबाबत माहिती दिली. त्यानंतर आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘आपण मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचे म्हणता; मात्र भेट घेऊनही प्रश्‍न सुटला नाही तर पुढे काय करायचे, तेही स्पष्ट व्हायला हवे. हक्‍काच्या पाण्यासाठी भीक मागणे बरोबर नाही.

जलसंपदा मंत्र्यांनी लक्ष देऊन पाणी सोडण्याचे आदेशच द्यायला हवेत, त्यावर चर्चा करून उपयोग काय? कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी साडेपाच हजार कोटी रुपये लागणार आहेत; मात्र दरवर्षी त्यासाठी केवळ शंभर ते दीडशे कोटी रुपये तरतूद केली जाते, हा काय प्रकार आहे?’’ असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर बंब म्हणाले, ‘‘खरे तर खासदार श्री. पवार व श्री. विखे पाटील यांनीच आपले पाणी अडवून ठेवले आहे. त्यांनी सांगितले, तर उद्याच पाणी मिळू शकेल,’’ अशी टिप्पणी त्यांनी केली. त्यानंतर चव्हाण यांनी पुन्हा एकदा माईकचा ताबा घेत ‘‘पवार हे बारामतीमध्ये असतात. त्यांनी कुठले पाणी अडविले?’’ असा प्रश्‍न करीत ‘‘पटेल तेच बोला! सत्ताधारी पक्षाचे आहात, चर्चा कशाला निर्णयच घ्यायला सांगा,’’ अशा शब्दांत त्यांना सुनावले. पाणीप्रश्‍नावरील बैठकीत या दोन आमदारांमधील कलगीतुरा चांगलाच रंगतदार ठरला.

बुधवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 
मराठवाड्याच्या हक्‍काचे पाणी तातडीने सोडण्यात यावे, तसेच समन्यायी पाणी वाटप व्हावे, या मागणीसाठी एकवटलेले सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, जलतज्ज्ञ बुधवारी (ता. २४) मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेऊन याबाबत चर्चा करतील, अशी माहिती आमदार बंब यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com