सदस्याने कुजलेली पिक आणले अधिसभेच्या बैठकीत

अतुल पाटील
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

  • संजय काळबांडेंची शुल्कमाफीची मागणी
  • शेतकऱ्यांचे पाल्य आर्थिक अडचणीत

औरंगाबाद : परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून पिके हातची गेली आहेत. शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडल्याने पाल्याचे शिक्षण कसे पुर्ण करायचे हा त्यांच्यापुढे प्रश्‍न आहे. यामुळे विद्यापीठाने सगळ्याच प्रकारचे शुल्क माफ करावे, अशी मागणी करताना ऍड. संजय काळबांडे यांनी शेतातील कुजलेले पिक सभागृहात आणत अधिसभा बैठकीत दाखवले. कुलगुरुंना परिस्थितीची दाहकता दाखवण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी (ता. 16) अधिसभेची बैठक झाली. महात्मा फुले सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्‍ते, कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्यासह अधिसभा सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

BAMU Aurangabad News
संजय काळबांडे यांनी शेतातील कुजलेले पिक सभागृहात आणत अधिसभा बैठकीत दाखवले

सुरवातीला ऍड. काळबांडे यांनी शेतकऱ्यांची कैफियत सभागृहात मांडली. शेतकऱ्यांची मुले पैश्‍याअभावी संकटाशी सामना करत आहे. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत खानावळ सुरू करावी, कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करावी, तसेच सर्वच प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

सगळेच शुल्क माफ करा...

विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केल्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत घेतल्याचे सांगितले. यानंतरही शासनाने शैक्षणिक शुल्क माफ केले तर, विद्यापीठातर्फे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेत निर्णय घेण्यात येईल. विनाअनुदानित महाविद्यालयांनाही याचा फायदा होऊ शकेल. यावेळी विजय सुबुकडे यांनी अधिसभेच्या बैठकीचा प्रवासभत्ता दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या निधीमध्ये टाकण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला, त्यास सगळ्याच सदस्यांनी होकार दिला.

उधळपट्टीवर गाजली बैठक...

अधिसभा बैठक नॅक मुल्यांकनाच्या नियमबाह्यपणे केलेल्या उधळपट्टीच्या विषयावर गाजली. तत्कालिन कुलगुरूंनी विशेष अधिकाराचा वापर करुन कामांना दिलेल्या मान्यता, यात अधिकाऱ्यांची भूमिका आणि काही नियुक्त पदाधिकाऱ्यांचा कथित सहभाग यावर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

अनेक कामांचे मूळ रक्कम वाढवून सुधारित बजेट देऊन कंत्राटदारास कामे देण्यात आले. या उधळपट्टीस कारणीभूत असलेले बांधकाम समिती सदस्य, कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करावी, न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. सुनील मगरे, डॉ. भाऊसाहेब राजळे यांनी केली. कायद्याच्या तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा..

...म्हणून जास्तीच्या निविदेतून उभारणार शिवरायांचा पुतळा

आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत हर्षदा पवारला सुवर्णपदक : पहा फोटो

अट्टल दारुडेच करताहेत इतरांना दारुमुक्‍त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BAMU Senete Meetiing News Aurangabad