कुलगुरुंचे परिनियमांवर तर, गोंधळी सदस्यांचे तोंडावर बोट

अतुल पाटील
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

  • प्रश्‍नोत्तराला तासापेक्षा अधिक वेळ नाहीच
  • संवैधानिक अधिकाऱ्यांची पदे दोन महिन्यात भरणार
  • पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा मार्च 2020 पूर्वी घेणार

औरंगाबाद : विषय सोडून ऐनवेळी भावनिक मुद्‌द्‌यांना हात घालून चर्चा भरकटवणाऱ्या सदस्यांची अधिसभा बैठकीचे अध्यक्ष कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी शनिवारी चांगलीच शाळा घेतली. अधिसभेचे कामकाज दुसऱ्या दिवशीपर्यंत चाललेले ज्या सभागृहाने पाहिले, त्याच सभागृहाने आज काम वेळेत पुर्ण होऊन सर्व विषय मार्गी लागल्याचेही पाहिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात शनिवारी (ता. 16) अधिसभेची बैठक झाली. व्यवस्थापन परिषदेच्या बैठका केल्या मात्र, कुलगुरु म्हणून डॉ. येवले यांची अधिसभेची ही पहिलीच बैठक होती. विषय सोडून बोलणाऱ्यांना थांबवण्याचे धाडस गेल्या दहा वर्षात तरी, कुठल्या अध्यक्षांनी केले नव्हते. ते काम डॉ. येवलेंनी केले. यामुळे सकाळी साडेअकराला वाजता सुरु झालेली बैठक सायंकाळी पाच वाजता संपल्याचे पहायला मिळाले.

Senete Meeting BAMU Aurangabad
अधिसभा बैठकीचे अध्यक्ष कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतली शाळा

प्रश्‍नोत्तरासाठी एकच तास...

जेवायला जाण्यापूर्वीच बैठकीत परिनियमांप्रमाणे प्रश्‍नोत्तरासाठी केवळ एक तासच वेळ देण्यात येईल, असे सांगूनच सुट्टी झाली होती. त्यानंतर बैठकीत एक तास वेळ पुर्ण झाला, तोपर्यंत केवळ चारच प्रश्‍न चर्चेला आले होते. त्यानंतरही प्रश्‍न घेण्यात यावेत, अशी मागणी सदस्यांनी केली मात्र, त्यास कुलगुरुंनी लेखी उत्तर दिल्याचे सांगत वेळ वाढवून देण्यास नकार दिला. यानंतरही काही उपप्रश्‍न असल्यास बैठक संपल्यानंतर केबिनमध्ये येऊन भेटा. रात्री दहा वाजेपर्यंत बसायला मी तयार आहे. असे सांगत धीटपणा दाखवला.

भाषण नको, प्रस्ताव मांडा...

पहिलीच बैठक असल्याने शेवटी ऐनवेळचे प्रस्ताव घेतले, मात्र यापुढे असे चालणार नाही. यावेळी सदस्य अतिरिक्‍त बोलू लागल्याने कुलगुरुंनी त्यांना थांबवत भाषण करु नका, प्रस्ताव मांडा असे सुनावले. यानंतर ते ऐकण्यास तयार नसल्याने असे परिनियमात सांगितले आहे, असे सुनावले. यापुढे ऐनवेळचे प्रस्तावदेखील किमान पाच दिवस आधी परिनियमाप्रमाणेच ते स्विकारले जातील, असे सांगायलाही डॉ. येवले विसरले नाहीत. बैठक विनागोंधळ पार पडल्याने सदस्यांनीही खासगीत कुलगुरुंचे कौतुक केले.

विद्यापीठ ट्रेंड सेटर व्हावे - कुलगुरु

मराठवाड्यातील विद्यार्थी, शिक्षकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. विद्यार्थी केंद्रित विद्यापीठ म्हणून पुढे येत आहे. आगामी काळात संशोधन, प्रशासन, परीक्षा व नवोन्मेष या चतु:सूत्रीचा अवलंब करुन आपले विद्यापीठ "ट्रेंड सेटर' म्हणून ठसा उमटविण्याचा प्रयत्न करेल, असा विश्‍वास कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्‍त केला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठावर राष्ट्रपती नियुक्त कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

हे ही वाचा..

...म्हणून जास्तीच्या निविदेतून उभारणार शिवरायांचा पुतळा

सदस्याने कुजलेली पिक आणले अधिसभेच्या बैठकीत

आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत हर्षदा पवारला सुवर्णपदक : पहा फोटो

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BAMU Senete Meetiing News Aurangabad