हाती नाही "अर्थ', बाजाराचे मंद "चक्र' 

राजेंद्रकुमार जाधव - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 4 जानेवारी 2017

उस्मानाबाद - नोटाबंदीनंतर गेल्या पावणेदोन महिन्यांपासून पैसे काढण्यासाठी बॅंक आणि एटीएमसमोरील रांगा अद्यापही कायम आहेत. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतीमाल असूनही विक्रीनंतर एकरकमी पैसा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

उस्मानाबाद - नोटाबंदीनंतर गेल्या पावणेदोन महिन्यांपासून पैसे काढण्यासाठी बॅंक आणि एटीएमसमोरील रांगा अद्यापही कायम आहेत. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतीमाल असूनही विक्रीनंतर एकरकमी पैसा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

डिसेंबरमध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी पूर्ण करून तुरीच्या काढणीला सुरवात केली आहे; परंतु शेतीमाल अडतीवर घेऊन गेल्यानंतरही शेतकऱ्यांना रोख रक्कम मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. नोटाबंदीची घोषणा आणि शेतीमालाची आवक येण्याचा कालावधी एकच असल्याने अडत व्यापाऱ्यांनी काही दिवस पैशाअभावी शेतीमाल घेणे नाकारले. त्यातच शेतकऱ्यांना पैशाची गरज व सोयाबीन, तुरीची आवक वाढल्याने या मालाच्या भावातही घसरण होत गेली आहे. 

विजेची समस्या सुरू 
जिल्ह्यात सप्टेंबरअखेर 15 दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत केलेल्या कामांमुळेही पाणीसाठा झाला. रब्बी पिके जगविण्यासाठी या पाण्याचा फायदा करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, त्यांना पुरेशी वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत. रात्रीच्या वेळी वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. 

शेतकऱ्यांचे आंदोलन 
तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असली तरी काही शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे वळले आहेत. कृषी विभागाच्या विविध योजनांअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून शेतकऱ्यांनी शेडनेट उभे केले आहेत. काही शेतकऱ्यांनी शेततळी तयार केले. कांदा चाळीचीही उभारणी शेतकऱ्यांनी स्वःखर्चातून केली आहे; परंतु जिल्ह्यातील जवळपास दीड हजार शेतकऱ्यांचे अनुदानासाठीचे प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहेत. अनुदानाची ही रक्कम 17 कोटी 50 लाख रुपये आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित केला व कृषिमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक लावण्याची मागणी लावून धरली. 

उमेदवारांच्या चाचपणीवर भर 
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार असल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, उमेदवारांच्या चाचपणीवर भर दिला आहे. तालुकानिहाय बैठका घेऊन गट व गणनिहाय उमेदवारांची चाचपणी करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष या चारही प्रमुख पक्षांनी तालुकानिहाय बैठकांची एक फेरी पूर्ण केली आहे. 

शिवसेनेतील फूट उघड 
नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील आठ पालिकांच्या निवडणुका झाल्या. डिसेंबरअखेर या पालिकांमधील उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडणुका पार पडल्या. उस्मानाबाद पालिकेच्या उपाध्यक्ष निवडीच्या वेळी शिवसेनेमध्ये फूट पडल्याचे उघड झाले. नगराध्यक्ष शिवसेनेचा असून, उपाध्यक्ष भाजपला देण्याबाबत शिवसेना व भाजपमध्ये युती झाली होती. युतीचा अधिकृत उमेदवार असतानाही शिवसेनेच्या सूरज साळुंके यांनी उमेदवारी कायम ठेवून उपाध्यक्षपद मिळविले. त्यांना शिवसेनेतील 11 पैकी सहा नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविला. त्यामुळे शिवसेनेतील फूट उघड झाली. 

नोटिसा रद्द करण्याची सूचना 
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आर्थिक अडचणीत आहे. या बॅंकेकडून ठेवी मिळाव्यात म्हणून ठेवीदारांकडून तगादा लावला जात आहे. त्यामुळे बॅंकेने थकबाकीदारांना वसुलीसाठी गेल्या महिन्यांत नोटिसा पाठविल्या आहेत. त्यात घरासमोर मंडप लावून बॅंड वाजविण्याचा उल्लेख नोटिसीमध्ये केला आहे. हा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित झाल्यानंतर या नोटिसा रद्द करण्याची सूचना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली. 

Web Title: Ban notes hit