keli lagvad
keli lagvad

पाच हजार हेक्‍टरवर होणार केळीची लागवड

गिरगाव (जि. हिंगोली) : वसमत तालुक्‍यातील गिरगाव परिसरात केळीच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या वर्षी अंदाजे पाच हजार हेक्‍टरवर केळीची लागवड होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या केळीचे बेणे लागवडची लगबग सुरू आहे.  

वसमत तालुक्यातील गिरगाव व परिसरातून इसापूर व येलदरी धरणाचे कालवे जातात. या धरणात तीन ते चार वर्ष पुरेसा पाणीसाठा नसल्याने शेतकऱ्यांना बागायती पिके घेता आली नव्हती. या वर्षी मात्र येलदरी व इसापूर या दोन्ही धरणात मुबलक पाणीसाठा तयार झाला आहे. पाणीसाठा वाढल्याने या वर्षी पाच ते सहा पाणीपाळ्या सोडण्यात येणार अाहेत. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी बागायतीचे क्षेत्र वाढविण्यास सुरवात केली आहे.


गिरगावसह परजना, खाजमापूरवाडी, सोमठाणा, पार्डी बुद्रुक, डिग्रस खुर्द, बोरगाव बुद्रुक, बोरगाव खुर्द, मुंरुबा, माळवटा या गावातील शेतकऱ्यांनी इसापूर व येलदरी धरणाच्या पाण्याचा लाभ घेण्याचे नियोजन केले आहे. खरीप पिकाने दगा दिल्याने आता शेतकऱ्यांनी केळी पिकांना पसंती दिली आहे. त्यामुळे केळीचे बेणे लागवडीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, केळी लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक खर्च सहन करावा लागत आहे. केळीचे एक हजार बेने काढणीस बाराशे रुपयांचा खर्च येत आहे. शिवाय एक गढा बेणे पाच रुपयांना खरेदी करावा लागत आहे. सरासरी एक शेतकरी दोन ते तीन हजार केळे बेण्याची लागवड करत आहे.


जवळपास गिरगावसह परिसरात पाच हजार हेक्टरवर केळी लागवडीचे श्रेत्र राहणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या बाजारात केळीला पंधराशे ते सोळाशे रुपये क्‍विंटलचा भाव मिळत आहे. या वर्षी येलदरी व इसापूर धरणाच्या पाणीपाळ्या मिळणार असल्याने शेतकऱ्यांतून पिकांचे नियोजन केले जात आहे.


धरणाच्या पाण्याचा होणार फायदा
दोन ते तीन वर्षांपासून इसापूर व येलदरी धरणाच्या कालव्याला पाणीपाळी सोडण्यात आली नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या वर्षी मात्र परतीच्या पावसाने मुबलक पाणीसाठा झाला असून पाणीसाठा वाढला आहे. यावर्षी सहा पाणीपाळ्या दिल्या जाणार आहे. त्यामुळे केळीची लावगड सुरू केली असल्याचे शेतकरी रामचंद्र कऱ्हाळे यांनी सांगितले.



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com