कोरोनामुळे केळी उत्पादक संकटात 

कुंभार पिंपळगाव : येथील शेतातील केळीची बाग.
कुंभार पिंपळगाव : येथील शेतातील केळीची बाग.

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. तर वाहतूकदार मिळत नसल्याने व्यापारीही अडचणीत आले आहेत.

जून महिन्यात लागवड केलेल्या केळीचे घड उतरायला आले असून ऊन, उष्णता यामुळे केळी झाडावरच पिकत आहेत. तर ओझ्यामुळे काही झाडे मोडून पडत आहेत. 
दोन-तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने आधार झाला. नदी-नाले, विहिरी, कूपनलिका, बंधारा यासह जायकवाडीचा डावा कालवा पाण्याने भरून जात असल्याने परिसरात दोनशे ते अडीचशे एकर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आलेली आहे. जून महिन्यात लागवड केलेली केळी आता परिपक्व झाली आहे.

परिसरातून पुणे, मुंबई, कोल्हापूर, बीड, लातूर, औरंगाबाद यासह राज्याबाहेरही केळी पाठवल्या जातात. येथील व्यापारी केळीची खरेदी करतात व ठोक व्यापाऱ्यांना माल पाठवतात, तर कधी बाहेरचे व्यापारी थेट शेतात येऊन फड खरेदी करून टप्प्याटप्प्याने माल उतरवतात; मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद आहेत.

वाहतुकीचे साधन नाही. यामुळे केळी कशा विक्रीला न्यायच्या हा प्रश्‍न उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच ढगाळ वातावरण, कधी अवकाळी पाऊस, गारपीट, तर दुसरीकडे उन्हाची वाढलेली तीव्रता, दमट हवामान यामुळे उतरायला आलेले केळीचे घड पिकू लागले आहेत. तर झाडांना ओझे तोलत नसल्याने झाडे मोडत आहेत. यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद असल्याने इसारा देऊन ठरविलेल्या बागा सोडून देण्याची वेळ आली आहे. माल पाठवता येत नाही, उतरवता येत नाही शिवाय भावही नाही. केळी लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांना ॲडव्हान्स दिला आहे. मात्र, शेतकरीच संकटात असल्याने काही करता येत नाही. 
- पाशा बागवान, व्यापारी 

बाजारपेठ बंद असल्याने व्यापारी माल खरेदी करण्यासाठी येईनात, काढणीला आलेल्या मालाचे नुकसान होत आहे. बाजार बंद असल्याने भावही नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. 
आप्पासाहेब कंटुले
केळी उत्पादक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com