बाणगंगा प्रकल्प दोन महिन्यांपासून कोरडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

भूम  तालुक्‍यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने तलाव कोरडे पडले आहेत. केवळ रिमझिम पाऊस होत आहे. हलका पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे; मात्र पाणीप्रश्‍न कायमच आहे.

भूम (जि. उस्मानाबाद) ः तालुक्‍यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने तलाव कोरडे पडले आहेत. केवळ रिमझिम पाऊस होत आहे. हलका पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे; मात्र पाणीप्रश्‍न कायमच आहे.

रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना फायदा झाला आहे; मात्र पाणीटंचाई "जैसे थे' असल्याने शेतकरी जोरदार पावसाची वाट पाहत आहेत. गेल्या आठवड्यात रिमझिम पावसामुळे सोयाबीन, मूग, मका, कपाशी ही पिके बहरात आहेत. हा पाऊस पिकांना पोषक ठरला आहे; मात्र गेल्या चार दिवसांपासून कडक ऊन पडत आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास जमिनीतील ओलावा संपून पिके धोक्‍यात येतील, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

काही प्रकल्पांत मोजकेच पाणी असल्याने भरपावसाळ्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तालुक्‍यातील ईट, भूम, माणकेश्वर येथे थोडाफार चांगला, तर वालवड, आंबी भागात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. परिसरात अजूनही जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे जलस्रोत कोरडेच आहेत.

11 ऑगस्टपर्यंत भूम महसूल मंडळात 236 मिलिमीटर, माणकेश्वर महसुली मंडळात 253, ईट महसूल मंडळात 319, वालवड महसुली मंडळात 135, आंबी महसुली मंडळात 139 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. तालुक्‍यात सरासरी 216 मिलिमीटर पाऊस झाला आहे. कमी पर्जन्यमानामुळे भविष्यात भयानक दुष्काळी परिस्थीती उद्‌भवण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सध्या तालुक्‍यातील घुलेवाडी, उमाचीवाडी तलाव कोरडे आहेत. वाकवड पाझर तलाव 0.43 टक्के पाणी आहे. बाणगंगा मध्यम प्रकल्प, रामगंगा मध्यम प्रकल्प कोरडा आहे. कुंथलगिरी तलावात 0.89 टक्के, नांदगाव साठवण तलावात 50 टक्के पाणीसाठा आहे. भूम शहरासह वाशी तालुक्‍याची तहान भागवणाऱ्या आरसोली तलावात मोजक्‍याच दिवसांचे पाणी शिल्लक राहिल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न बिकटच होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Banganga' dry for two months