
बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी येथील बंजारा समाजाच्या वतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केला आहे.
परळी वैजनाथ (जि.बीड) : येथील बंजारा समाजाच्या वतीने भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी चर्चेदरम्यान माध्यमांमध्ये बंजारा समाजाची बदनामी केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा यासाठी येथील शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केली आहे. येथील पुजा लहू चव्हाण या युवतीने पुण्यात आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर तथाकथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
माध्यमांतील चर्चेदरम्यान आमदार अतुल भातखळकर यांनी बंजारा समाजाच्या भावना दुखावतील (राठोडगिरी) असे अश्लील व जातीवाचक शब्दांचा प्रसारमाध्यमांवर बदनामीकारक माहिती प्रसारित केली. यामुळे बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी येथील बंजारा समाजाच्या वतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केला आहे. यावेळी बाळासाहेब चव्हाण, विजय राठोड, प्रकाश चव्हाण, डी.एस.राठोड, कुंडलिक राठोड, विकास पवार, नरेश राठोड, करण पवार, पंडित जाधव, रविराज राठोड आदी उपस्थित होते.
संपादन - गणेश पिटेकर