बॅंक फोडण्याचा गोंदेगावात प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सोमवारी (ता. 15) पहाटे केला. मात्र तिजोरी फोडताना सायरनचा आवाज आल्याने चोरटे पळून गेल्यामुळे बॅंकेतील रक्कम सुरक्षित राहिली.

बनोटी (जि. औरंगाबाद) - गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सोमवारी (ता. 15) पहाटे केला. मात्र तिजोरी फोडताना सायरनचा आवाज आल्याने चोरटे पळून गेल्यामुळे बॅंकेतील रक्कम सुरक्षित राहिली.

गावाच्या मुख्य बाजारपेठेजवळ महाराष्ट्र बॅंकेची शाखा आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता शाखेतील व्यवहार संपल्यानंतर बॅंक बंद करण्यात आली. पहाटे पावणेदोन वाजता कारमधून आलेल्या चोरट्यांनी प्रथम बॅंकेच्या शटर चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्‍शन तोडण्याच्या प्रयत्नात इंटरनेट कनेक्‍शनच्या वायर तोडल्या. तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करत असताना बॅंकेचा सायरन वाजत असल्याने चोरट्यांनी तो बंद करण्याचा प्रयत्न केला; परंतु नागरिक जागे झाल्याच्या संशयाने तिजोरी फोडण्याचे सोडून कनेक्‍टिव्हिटी डेस्कटॉप घेऊन चोरटे पसार झाले. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील एटीएम चोरी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी येथील बॅंक फोडल्याचा प्रयत्न झाल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. बॅंकेचे रोखपाल सकाळी फिरायला जात असताना त्यांना बॅंकेचे गेट उघडे असल्याचे दिसले, मात्र बॅंकेचे कर्मचारी साफसफाई करत असतील, असे समजून ते निघून गेले. साफसफाई कर्मचारी वैभव पाखले सकाळी आठ वाजता बॅंकेत आले असता, बॅंक फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती शाखा व्यवस्थापक संतोष कुमार, रोखपाल विष्णुपंत सोनवणे यांना दिली. याप्रकरणी बॅंक व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank Robbery Trying Crime