आध्यात्मिक कार्यातून मनाला शांती मिळते - पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

केसरजवळगा - स्पर्धेच्या युगात गुरू ही काळाची गरज असून, समाजात वावरताना प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक शिक्षणाचीही आवश्‍यकता आहे. आध्यात्मिक कार्यातून मनाला शांती मिळते. राजसत्ता व धर्मसत्ता दोघांनी मिळून आगामी काळात काम केल्यास समाजाचा विकास होऊ शकतो, असे मत आमदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.

केसरजवळगा - स्पर्धेच्या युगात गुरू ही काळाची गरज असून, समाजात वावरताना प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक शिक्षणाचीही आवश्‍यकता आहे. आध्यात्मिक कार्यातून मनाला शांती मिळते. राजसत्ता व धर्मसत्ता दोघांनी मिळून आगामी काळात काम केल्यास समाजाचा विकास होऊ शकतो, असे मत आमदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.

वीरंतेश्‍वर देवरू यांचा निरंजर चर पट्टाधिकार महोत्सव सोमवारी (ता.10) पार पडला. या वेळी आमदार पाटील बोलत होते. तत्पूर्वी राजशेखर महास्वामी यांनी वीरंतेश्‍वर देवरू यांना एका बंद खोलीत पाच महास्वामींच्या उपस्थितीत चिन्मय अनुग्रह व षटस्थलब्रह्म उपदेश दिला. त्यानंतर झालेल्या धर्मसभेस आमदार सिद्धाराम म्हैत्रे, माजी आमदार सुभाष गुत्तेदार, माजी महापौर संजय सिंग (गुलबर्गा), शंभुलिंग शिवाचार्य (उदगीर), स्वामीनाथ महास्वामी (सोलापूर), मरूळसिद्ध महास्वामी (माडयाळ), शिवबसव महास्वामी (खेडगी), गुरूमहंत महास्वामी (नरोणा), रेवणसिद्ध महास्वामी (नागणसूर), जयशांतलिंग महास्वामी (हिरेननागाव), गुरूपादलिंग महास्वामी (बबलाद), अभिनव शिवलिंग महास्वामी (मादन हिप्परगा), कोट्टूर महास्वामी (गंगावती), सदाशिव महास्वामी (हावेरी), सिद्धेश्वर महास्वामी (देवणी), बसवलिंग महास्वामी (अक्कलकोट), शिवयोगी शिवाचार्य (अणदूर), गंगाधर महास्वामी (जेवळी), वृषभेद्र महास्वामी (होदलूर), बसवराजेंद्र महास्वामी (अचलेर), मुरघेंद्र देवरू (चांभाळ) यांची उपस्थिती होती.

आमदार पाटील म्हणाले, की वीरंतेश्‍वर देवरू यांनी म्हैसूर आणि काशी पीठात उच्चशिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे म्हणजे भाग्यच आहे. सर्वगुणसंपन्न महाराज मठाला मिळाल्याने भाविकांना निश्‍चितच लाभ होईल, असे ते म्हणाले.

आमदार म्हैत्रे यांनी जडीबसवलिंगेश्‍वर महास्वामींप्रमाणे वीरंतेश्‍वर महाराज हे भाविकांची मने जिंकतील, असा विश्‍वास व्यक्त केला. "ये भोलाशंकरा तिनो लोक में तू ही त'ू, या गाण्यावर उदगीर येथील रामलिंग स्वामी यांनी डोक्‍यावर भरलेली घागर घेऊन केलेले नृत्य पाहून भाविक भारावून गेले. या वेळी श्री. गुत्तेदार, अभिनव महास्वामी, बसवराज शास्त्री यांची भाषणे झाली. प्रा. सायबण्णा घोडके यांनी प्रास्ताविक केले. चन्नमल्ल देवरू यांनी सूत्रसंचालन केले. सायंकाळी पाच वाजता वीरंतेश्‍वर देवरू यांची वाजत गाजत मठापासून अड्डपालखी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून पुन्हा मठात आल्यानंतर भाविकांना महास्वामींच्या हस्ते प्रसाद वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

पन्नास हजार भाविकांनी घेतले दर्शन
राज्यासह कर्नाटक राज्यातून आलेल्या पन्नास हजार भाविकांनी सोहळ्यास उपस्थिती लावली. सर्व भाविकांना महास्वामींचे दर्शन घेता यावे, यासाठी तीनशे स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती. भाविकांसाठी सकाळी नाश्‍ता, तसेच दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था मठाच्या सभागृहात करण्यात आली होती. तर दत्ता घोडके यांनी शुद्ध पाण्याची सोय केली होती. संजय सिंग यांच्याकडून भव्य मंडप उभारण्यात आला होता. तर गंगाधर चिंचकोटी व डॉ. आर. एस. गुबवड (गुलबर्गा) यांनी संपूर्ण भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती.

Web Title: basavraj patil talking