
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दुसऱ्यांदा टाळेबंदी सुरू आहे. पण एवढ्यावरच कोरोना संपणार नाही. आपण शून्यावर असलो तरी तसेच राहू असे नाही. त्यामुळे पुढील तीन महिने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी श्री. देशमुख यांनी बुधवारी (ता.१५) महापालिका, महसूल तसेच पोलिस प्रशासनाची बैठक घेतली.
लातूर ः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दुसऱ्यांदा टाळेबंदी सुरू आहे. पण एवढ्यावरच कोरोना संपणार नाही. आपण शून्यावर असलो तरी तसेच राहू असे नाही. त्यामुळे पुढील तीन महिने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी श्री. देशमुख यांनी बुधवारी (ता.१५) महापालिका, महसूल तसेच पोलिस प्रशासनाची बैठक घेतली. कोणकोणत्या विभागाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, त्याची अंमलबजावणी कशी सुरू आहे याची माहिती श्री. देशमुख यांनी यावेळी घेतली.
परराज्यांतून आलेल्या आठ व्यक्तीच पॉझिटिव्ह आहेत. पण लातूर जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. अशीच परिस्थिती पुढे कायम राहिली पाहिजे. लातूर शहर मोठे आहे. लोकसंख्याही जास्त आहे. हे लक्षात घेऊन शहराच्या सर्व सीमा बंद कराव्यात, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या. शहरात सध्या भाजीपाला खरेदी, किराणा दुकाने, बँकांसमोर तसेच रेशन दुकानात नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. ही गर्दी तातडीने कशी आटोक्यात आणता येईल याच्या उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा टाळेबंदी सुरू आहे. काही दिवसांत टाळेबंदीमध्ये काही शिथिलता येण्याची शक्यता आहे. ते संपले म्हणजे सर्व काही संपले असे नाही.
वाचा ः खरेदीसाठी गर्दी वाढली अन् लातुरात वाहतूक कोंडी झाली, सामाजिक अंतराचा बोजवारा
आपण शून्यावर असलो तरी असेच राहू असेही नाही. त्यामुळे काळजी घेतलीच पाहिजे. पुढील तीन महिने आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. या काळात सर्वच यंत्रणांनी सतर्क राहिले पाहिजे. एखादी लस येत नाही तोपर्यंचा काळ महत्त्वाचा आहे. नागरिकांची जीवनशैली बदलली आहे. त्यांच्यात भीतीचे वातावरण तयार होता कामा नये. पण खबरदारी घेतलीच पाहिजे. सामाजिक अंतर राखले जावे याकरिता सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही श्री. देशमुख यांनी यावेळी केले. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपअधीक्षक सचिन सांगळे, महापालिकेचे संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.