ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवताय, सावधान! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

काय घ्यावी खबरदारी? 
- ऑनलाइन खाद्यपदार्थांत काही गडबड दिसल्यास ऑर्डर घेणाऱ्यासमक्ष हॉटेलशी संपर्क करा. 
- खाद्यपदार्थात भेसळ असेल तर त्याची कंपनीसह तक्रार अन्न व औषधी प्रशासनाकडे करा. 

औरंगाबाद - ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवताय, मग याकडे लक्ष द्या, ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यानंतर ते तपासून खात्री करा; अन्यथा आपलीही मोठी फसवणूक होऊ शकते. असा प्रकार औरंगाबादेत शुक्रवारी (ता.18) घडला. शहरातील सचिन जमधडे यांनी एका कंपनीकडून ऑनलाइन पनीर चिली मागवली होती. त्यांच्या ऑर्डरमध्ये पनीरसोबत प्लॅस्टिकचे तुकडे आल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून बचत होत असली तरी फसवणुकीचे प्रकार होत ग्राहकांच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रयत्न होतोय. यामुळे ऑनलाइन ऑडर देताना जरा जपूनच. 

शहरात झोमॅटो, उबेर कॅब, स्विगी या तीन कंपन्यांतर्फे ऑनलाइन फूड डिलेव्हरीची सुविधा आहे. या कंपन्याकडून ऑनलाइन ऑर्डर दिल्यानंतर ग्राहकांना दहा ते 30 टक्‍केपर्यंत सूट मिळते. या कंपन्यांमुळे खाणावळीपासून ते छोट्या-मोठ्या हॉटेलपर्यंत सर्वांना मोठा फायदा झाला आहे. शिवाय या कंपन्यांमुळे दोन हजार तरुणांना रोजगार मिळाला असून, ग्राहकांचाही विश्‍वास बसला. मात्र, दोन ते तीन महिन्यांपासून या कंपन्यांविरोधात ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. 

पहिली घटना 
झोमॅटोची सर्व्हिस देणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत झोमॅटोला ऑर्डर देणाऱ्या ग्राहकाचे पार्सल उघडून कर्मचारी टेस्ट करताना दिसत होता. यावरून या कंपनीवर ग्राहकांनी नाराजी व्यक्‍त केली होती. 

दुसरी घटना 
सचिन जमधडे या ग्राहकाने शुक्रवारी सायंकाळी झोमॅटोवरून पनीर चिली आणि इतर काही पदार्थांची ऑर्डर केली होती. मात्र घरी आल्यानंतर जेवताना पनीर तुटत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर नीट निरखून पाहिले असता संबंधित पदार्थ हा पनीर नसल्याचे लक्षात आले. सचिनने संबंधित हॉटेल गाठून चौकशी केली असता हॉटेलचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ग्राहक सचिन जमधडे यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्लॅस्टिकसदृश असणारा पदार्थ "एफडीए'कडे तपासणीसाठी दिल्याची माहितीही जमधडे यांनी दिली. 

अन्य घटना 
शहरातील एका ग्राहकाने फ्लिपकार्ट कंपनीकडे मागविलेल्या ऑर्डरमध्ये चक्‍क विटांचे तुकडे आले होते. अशाच प्रकारे बॉलीवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनीही हेडफोनची ऑनलाइन ऑर्डर दिली होती. त्यांच्या ऑर्डरमध्ये तुटका नळ निघाला होता. 

काय घ्यावी खबरदारी? 
- ऑनलाइन खाद्यपदार्थांत काही गडबड दिसल्यास ऑर्डर घेणाऱ्यासमक्ष हॉटेलशी संपर्क करा. 
- खाद्यपदार्थात भेसळ असेल तर त्याची कंपनीसह तक्रार अन्न व औषधी प्रशासनाकडे करा. 

Web Title: Be careful online foodstuffs