मुलांचे मित्र बना, शत्रू नव्हे ; समुपदेशकांचा पालकांना सल्ला

संकेत कुलकर्णी
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : लहान मुलांची मानसिक क्षमता ओळखा. त्यांचे मित्र बना. मुलांच्या भविष्याची काळजी करतानाच थोडे वर्तमानाकडेही लक्ष दिले, तर मुले दुरावणार नाहीत, असा सल्ला समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांना दिला आहे. 

औरंगाबाद : लहान मुलांची मानसिक क्षमता ओळखा. त्यांचे मित्र बना. मुलांच्या भविष्याची काळजी करतानाच थोडे वर्तमानाकडेही लक्ष दिले, तर मुले दुरावणार नाहीत, असा सल्ला समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांना दिला आहे. 

पालकांच्या अपेक्षांच्या भाराने मुलांच्या मनाचा कोंडमारा होत असल्याचे चित्र "सकाळ'च्या वृत्तमालिकेतून समोर आल्यानंतर पालकांनीही त्याला प्रतिसाद देत अनेक शंका उपस्थित केल्या. समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी पालकांना खास टिप्स दिल्या आहेत. पालकत्व प्रशिक्षक रामेश्‍वर दुसाने यांनीही आपले मत "सकाळ'कडे व्यक्त केले आहे. 

लहान मुलांनाही अनेक भावना असतात. त्या पालकांनी वेळोवेळी योग्य पद्धतीने हाताळल्या नाहीत, तर पुढे त्रासदायक ठरते. मुलांना त्यांचे इमोशन्स योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवणे, भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवणे, योग्य मार्ग दाखवणे, हे आजच्या पालकांपुढील मोठे आव्हान बनले आहे, असे डॉ. शिसोदे म्हणाले. जेव्हा ही मुलं आपल्या भावना, कल्पना सांगू शकत नाहीत, व्यक्त होऊ शकत नाहीत, तेव्हा त्यांचा मनातल्या मनात कोंडमारा होतो आणि त्याचे रूपांतरण भलतीकडे होते. मानसिकरित्या ही मुलं कमजोर होतात. त्याचे प्रमाण वाढल्यास ती नेहमीकरिता मानसिकरित्या आजारीही होऊ शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

जन्माला आलेलं प्रत्येक मूल काहीतरी वेगळेपण घेऊन येतं. त्यांची भावनिक, मानसिक, शारीरिक जडणघडण वेगवेगळी असते. एकाच प्रसंगात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतील मुलांकडून; परंतु तरीही त्यांच्या भावनांचा आदर करा. त्यांना सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचाही अनुभव येऊ द्या. हे सगळं घडत असताना मोठ्या माणसांसारखे त्यांना पण जाणवू द्या. पालक म्हणून त्यांना कौशल्यनिपुण होण्यात मदत करा. आनंदी आयुष्य जगण्यात यशस्वी करा. 

- डॉ. संदीप शिसोदे 

आपलंच मूल आहे, त्याचा स्वीकार करून मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक करा. त्यांच्यातील क्षमता ओळखा. भविष्याची चिंता कमी करून वर्तमानाकडे बघा. सतत त्याच त्या सूचना देण्यापेक्षा त्याला पडलेल्या प्रश्नांसाठी उत्तरे शोधण्यासाठी आपण मदत करू शकतो का, यावर भर दिला पाहिजे. 

- डॉ. अपर्णा अष्टपुत्रे 

पालकांनी मुलांना आणि स्वतःलाही वेळ दिला पाहिजे. "मला हव्या असलेल्या गोष्टी ज्या कारणांमुळे मिळाल्या नाहीत, त्या सगळ्या मी मुलांना देणार. त्या बदल्यात मला आयुष्यात जे बनायचे, पण बनू शकलो नाही; ते मुलाने बनून दाखवावे,' अशी काही पालकांची इच्छा असते. आपल्या अतृप्त इच्छा मुलांवर लादणे ही विकृती आहे. स्वतःशी तृप्त असणारा पालक अशा पद्धतीने वागू शकत नाही. 

- रामेश्‍वर दुसाने 

यशस्वी पालक होण्यासाठी काही टिप्स 

0 मुलांचे भावविश्व जाणून घ्या. त्यांची भाषा, शब्द, देहबोली समजून घ्या. 
0 कोरडे कौतुक न करता ज्या शब्दांमध्ये भावनेचा ओलावा आहे, असे बोला. 
0 त्यांच्या मनातल्या वाईट, अप्रिय भाव-भावनांना दुर्लक्षित करू नका. 
0 मुलांना कमी लेखू नका. त्यामुळे तुमच्या नात्यात तणाव, दुरावा येऊ शकतो. 
0 दररोज संध्याकाळी त्यांच्यासोबत विचारांची देवाण घेवाण करा. 
0 पालक म्हणून तुमच्या अनुभवांची मुलांना योग्य शब्दात जाणीव करून द्या. 
0 नकारात्मक विचार हे त्रासदायक आणि तात्पुरते असतात, हे पटवून सांगा. 
0 भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे, हे मित्रत्वाच्या नात्याने त्यांना समजावून सांगा. 
0 आधी स्वतःतील तणाव कमी करून घरात आनंदी राहायला शिका. 
0 रागराग, चिडचिड करण्यापेक्षा आनंदी आयुष्य कसे जगता येईल हे पहा.

Web Title: be friend of child not enemy says counselor