मंदिरात घडले चक्‍क अस्वलाचे दर्शन

वालसावंगी : हातात काठ्या, मशाली घेऊन मदतीसाठी धावलेले युवक.
वालसावंगी : हातात काठ्या, मशाली घेऊन मदतीसाठी धावलेले युवक.

वालसावंगी -  डोंगरदऱ्यांमध्ये हिरवाईने नटलेली वनराई, परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत गुरुवारी (ता. आठ) सकाळी दोन मित्र डोंगराच्या कडेला छोट्या वाटेवरील काळिंका माता मंदिर परिसरात दर्शनासाठी गेले. मात्र, अरुंद दरवाजातून आत जाताना एकाला चक्‍क अस्वलच दिसले. प्रसंगावधान राखत दोघांनी पळ काढत मंदिराच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल दोन तास बसून काढले. अखेर वनरक्षकासह ग्रामस्थांनी त्यांची सुटका केली, अर्थात तोपर्यंत अस्वलही जंगलात निघून गेलेले होते. 

वालसावंगी येथील दिलीप वाघ (वय 30) आणि दुर्गादास वाघ (वय 20) हे दोघे गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास परिसरातील काळिंका माता मंदिराकडे गेले होते. सकाळची वेळ असल्याने सगळीकडे शुकशुकाट होता. दोघांनी येथील कुंडातील पाणी आणले व दर्शनासाठी मंदिरात जाऊ लागले. मंदिराचे प्रवेशद्वार खूपच लहान व अरुंद असल्याने गुडघे वाकून आत जावे लागते. दुर्गादासने दरवाजातून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तोच समोर मोठे अस्वल असल्याचे दिसले. चाहुल लागताच अस्वल त्याच्या अंगावर धावले. प्रसंगावधान राखत दुर्गादास लगेच मागे आला. दिलीपनेही निरखून पाहिले असता त्यालाही अस्वल दिसले. त्यामुळे भीतीपोटी दोघेही धाव घेत मंदिराच्या बाजूलाच असलेल्या पत्र्याच्या शेडवर चढले.

अस्वल मात्र मंदिरातच बसून होते. मदतीला आजूबाजूला कोणी नव्हते. त्यामुळे दोघांचा भीतीने थरकाप उडाला. त्यातच डोंगराळ भागामुळे मोबाईल फोनलाही नेटवर्कची रेंज मिळत नव्हती. त्यामुळे दोघेही हताश होते. अखेर मोबाईल फोनला रेंज मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ मित्रांना याबाबत माहिती दिली. तोपर्यंत ही खबर वाऱ्यासारखी पसरली. गावातील 20 ते 25 युवक, तसेच वनरक्षक प्रवीण गवळी यांनी मंदिराकडे धाव घेतली. तोपर्यंत दीड ते दोन तासांचा अवधी उलटला होता. दोघे जीव मुठीत घेऊन रिमझिम पावसात शेडवर मदतीला कुणीतरी येण्याची वाट बघत होते. काही वेळाने गावातील युवक मंडळी मंदिर परिसरात पोचली. मंदिराकडे जाणारी वाट अरुंद असल्याने खबरदारी म्हणून त्यांनी मशाली पेटविल्या. आरडाओरड करत ते मंदिरापाशी पोचले. अगोदर दिलीप व दुर्गादास यांना खाली उतरविले. नंतर, मशाली हाती घेत मंदिराकडे वळले. मात्र तोपर्यंत अस्वल जंगलात निघून गेलेले होते. 

अस्वल दिसल्याची माहिती मिळताच आम्ही युवकांसह तिथे मदतकार्यासाठी गेलो. अस्वलाचा मंदिरात शोध घेतला, मात्र आम्ही पोचेपर्यंत ते जंगलात पसार झाले होते. अस्वलाच्या पायाचे ठसेही जंगल भागातील मार्गावर उमटलेले दिसले. जंगल क्षेत्रात प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे अशा ठिकाणी ग्रुपने जावे, एकटे जाणे टाळावे. 
प्रवीण गवळी, 
वनविभाग कर्मचारी, वालसावंगी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com