बीड बंदला हिंसक वळण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

बीड - महापुरुषांच्या विरोधात अपशब्द वापरत सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. 22) जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. दुकाने व बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करताना दगडफेक झाल्यामुळे या बंदला हिंसक वळण लागले. दगडफेक आणि मारहाणीच्या घटना बीड शहरात घडल्यामुळे चारजण जखमी झाले आहेत. परिस्थिती बिघडू नये, यासाठी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता.

विठ्ठल तिडके नावाच्या तरुणाने चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून महापुरुषांबद्दल अपशब्द वापरत पोस्ट टाकल्या होत्या. याप्रकरणी आरोपीला जळकोट पोलिसांनी अटकही केली. परंतु, या घटनेचा निषेध म्हणून आज जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. संवेदनशील विषय असल्याने व्यापारी, संस्था, संघटना व विविध राजकीय पक्षांनी देखील बंदला पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदवला होता. सकाळपासूनच बीड शहरातील बाजारपेठ बंद होती. जिल्हाभरात देखील बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असताना बीडमध्ये सकाळी 11 वाजता काही तरुणांनी वाहन रॅली काढत बंदचे आवाहन केले. या वेळी काही दुकाने सुरू असल्याचे दिसल्यामुळे या तरुणांनी त्या दुकांनावर व बसवर दगडफेक सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. तर, मोमीनपुरा भागात करण्यात आलेल्या दगडफेकीत एका तरुणाचा हात मोडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येथे जमलेल्या जमावाने दगडफेक करणाऱ्या तरुणांना बेदम मारहाण केली. त्यामुळे वातावरण आणखीनच चिघळले. दगडफेकीच्या घटनेत पोलिसांसह चौघे जखमी झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, काही लोकांनी जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Web Title: beed ban violent turn