बीड बायपासला हवा आणखी बायपास! 

बीड बायपासला हवा आणखी बायपास! 

औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर मृत्यू थैमान घालीत आहे. दरदिवशी अपघात होत असून, वाहनचालकांना छोट्या-मोठ्या चुकांमुळे जीव गमवावा लागला. अपघातांची मालिका थांबविण्यासाठी प्रशासनाने थातूरमातूर उपाय केले. अतिक्रमण काढणे, सर्व्हिस रस्ता करणे व रुंदीकरणाचा मोठा गाजावाजा झाला. चक्क जड वाहतूकही वळविण्यात आली; पण वाढत्या नागरिकीकरणामुळे आता बीड बायपासला देखील पर्याय म्हणून आणखी बायपास रस्त्यांचीच गरज निर्माण झाली आहे. 

बीड बायपास रस्त्यावर गत 48 दिवसांत एकूण सहा बळी गेले. खासकरून देवळाई चौक व एमआयटी महाविद्यालयालगतच्या चौकात सतत मोठे अपघात होतात. यावर उपाय म्हणून मंगळवारपासून (ता. 18) पोलिस प्रशासनाने जड वाहतूक सात दिवसांसाठी अन्य मार्गांवर वळविली. यात पाचोड-पैठण रिंग रोड; तसेच केंब्रिज-सावंगी-फुलंब्री-खुलताबाद-कसाबखेडा या मार्गाने वापर करण्याचे निर्देश दिले आहेत; मात्र हा उपाय तात्पुरता आहे. बीड बायपासलाच पर्यायी बायपास मार्गाची गरज आहे. गत काही वर्षांत सातारा परिसरात मोठ्या वसाहती निर्माण झाल्या. त्यामुळे लोकसंख्याही वाढल्याने बीड बायपास मार्ग शहराच्या कक्षेत आला आहे. त्यामुळे या मार्गाला बायपास व महामार्ग न समजता शहरातील मुख्य मार्ग समजून मार्किंग करण्याची गरज आहे. फुटपाथ, सर्व्हिस रस्ता, झेब्रा क्रॉसिंग, भुयारी रस्त्यांची गरज आहे. हा मार्ग जालना रस्त्याला समांतर मार्ग आहे. त्यामुळे जालना व जळगाव रस्त्यासारखेच व्यवस्थापन महापालिका, पोलिस व जिल्हा प्रशासनाने करण्याची गरज आहे; तसेच शहराला वळण रस्ता (रिंग रोड) नाही. रिंग रोडची गरज शहराला असून, त्यामुळे वाहतूक सुकर बनून अपघातही कमी होतील. 

का हवेत बायपास? 
बीड बायपास भाग पूर्वी शहराबाहेर होता; पण वाढता विस्तार व लोकसंख्येमुळे नागरीकरण वाढले. परिणामी रहदारी वाढली. त्यातच शहरातून जाणारी जड वाहतूक बीड बायपासकडून वळविण्यात आली. त्यामुळे वाहतुकीचा प्रवाह अखंड बनला. शहराला बीड बायपास हा पर्याय झाला. अगदी तशाच पद्धतीने बीड बायपासलाच आता बायपास रस्त्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पावले उचलणे महत्त्वाचे आहे. 

अशा आहेत समस्या 
बीड बायपास आता भरवसतीतील महामार्ग झाला आहे; पण वाहतूक पोलिस चुकीच्या पद्धतीने नियमन करतात. 
रस्त्यावर वर्दळीच्या तुलनेत वाहतूक पोलिसांची संख्या कमीच आहे. 
रस्त्यावरील चौकात नियमनासाठी उन्हामुळे पोलिस थांबत नाहीत. 
मार्गावर वेगवान वाहतूक होते, यावर कोणताही अंकुश नाही. 
रॉंग साइड वाहने धावतात, त्यामुळे अपघाताची शक्‍यता बळावते. 
रस्त्याच्या रुंदीकरणरणाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. 
सर्व्हिस रस्ता, फुटपाथ नाही. अतिक्रमणाचाही प्रश्‍न कायम आहे. 

हे करता येतील उपाय 
बीड बायपासला आडवे भुयारी मार्ग असावेत. 
महामार्गाशी निगडित निकष तोडून स्पीडब्रेकर वाढवावेत. 
शहरातील प्रमुख मार्ग म्हणून बीड बायपासकडे पाहावे. 
वाहतुकीच्या वेगावर नियंत्रणासाठी वेगाची मर्यादा ठेवावी. 
वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी, डिजिटल तंत्रज्ञानाचे साहाय्य घ्यावे. 
या मार्गावरील प्रत्येक चौकात सिग्नलजवळ वाहतूक बूथ हवेत. त्यामुळे पोलिसांना चौकात उभे राहून नियमन करता येईल. 
बीड बायपासच्या दोन्ही प्रवेश मार्गावर वाहतूक पोलिसांकडून गतीसबंधी सूचना प्रत्येक वाहनचालकांना द्याव्यात. 
गती, अपघात व स्पीड लिमिटसंबंधित फ्लेक्‍स, मोठे बॅनर्स लावून वाहनचालकांत जागृती घडवावी. 
प्रत्येक चौकालगत कमीत कमी स्पीड ठेवण्याची सक्ती वाहनचालकांवर (दुचाकीसह) करावी. 
बीड बायपास रस्त्यावर स्वतंत्र वाहतूक पोलिस चौकी, नियंत्रण कक्ष निर्माण करावा. 
धोकादायक वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, त्यासाठी विशेष पथक असावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com