बीड शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

शहरातील नागरिकांना १५ ते २० दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागत नसल्यामुळे शहरातील स्वराज्यनगरमधील महिलांनी एकत्र येत गुरुवारी (ता. सहा) नगराध्यक्षांना निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने महिला एकत्र आल्या होत्या. नळाला वेळेवर पाणी येत नसल्यामुळे शहरातील नागरिकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे.

बीड - शहरातील नागरिकांना १५ ते २० दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागत नसल्यामुळे शहरातील स्वराज्यनगरमधील महिलांनी एकत्र येत गुरुवारी (ता. सहा) नगराध्यक्षांना निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने महिला एकत्र आल्या होत्या. नळाला वेळेवर पाणी येत नसल्यामुळे शहरातील नागरिकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे.

गतवर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस पडला, यामुळे जिल्ह्यातील तलावांमध्ये अल्प प्रमाणात पाणी शिल्लक राहिले. सध्या बीड शहराला माजलगाव तलावातून व पाली येथील बिंदुसरा तलावातून पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. बिंदुसरा तलावाने तळ गाठला आहे. परंतु, माजलगाव तलावात बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक असूनसुद्धा नगरपालिकेच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

शहरातील स्वराज्यनगर भागात १९ मे रोजी पाणी सोडण्यात आले होते. परंतु, त्यानंतर आजपर्यंत या भागात पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे येथील महिलांनी नगराध्यक्षांना निवेदन दिले. 

गुरुवारपर्यंत पाणी न आल्यास शुक्रवारी (ता. सात) शहरातील बार्शी रोडवर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा येथील महिलांनी दिला आहे. नामदेव चाळक, आशा घोडके, श्रीमती मंगल, श्रीमती चाळक, बी. जी. कल्याणकर, राणी कल्याणकर यांच्यासह इतर महिला व नागरिकांच्या या निवेदनावर सह्या आहेत. 

सध्या शहरात नगरपालिकेच्या वतीने नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु, शहरतील काही भागात वेळेवर पाणी सोडण्यात येत नाही. यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. सध्या एक हजार लिटरचे टॅंकर घेण्यासाठी नागरिकांना ४०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहेत. यासह दोन हजार लिटरला ८०० रुपये, सात हजार लिटरला १४०० रुपये, दहा हजार लिटरला १८०० रुपये नागरिकांना द्यावे लागत आहेत. पाण्याची कमतरता लक्षात येताच, खासगी टॅंकरचालकांनी मोठ्या प्रमाणात दर वाढविले आहेत. यामुळे नागरिकांना जास्तीचे पैसे मोजण्याची वेळ आली आहे.

खासगी टॅंकरचालकांची मनमानी; पाण्याचे भाव केले दुप्पट
१५-२० दिवसांनी येते नळाला पाणी, नागरिकांची तहान विकतच्या पाण्यावर
तलावात पाणी असूनही नियोजनाचा अभाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed City Water Management Collapse Water Supply