सत्ता तर मिळवलीत, आता आमच्या प्रश्नाकडेही पहा ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

बीड - पालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही क्षीरसागरांनी सर्व हातखंडे अवलंबले. बीडकरांनीही दोघांच्या पारड्यात कौल दिला. परंतू, आज बीडकडे दोघांनीही दुर्लक्ष केले की काय, असा प्रश्न पडत आहे. बहुतेक भागांत नाल्या तुंबल्याने दुर्गंधी सुटली आहे. पाणी पुरवठाही अनियमित होत आहे. बीडकरांचे प्रश्न दोघांपैकी सोडविणार कोण, असा प्रश्न आता पडला आहे. 

बीड - पालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही क्षीरसागरांनी सर्व हातखंडे अवलंबले. बीडकरांनीही दोघांच्या पारड्यात कौल दिला. परंतू, आज बीडकडे दोघांनीही दुर्लक्ष केले की काय, असा प्रश्न पडत आहे. बहुतेक भागांत नाल्या तुंबल्याने दुर्गंधी सुटली आहे. पाणी पुरवठाही अनियमित होत आहे. बीडकरांचे प्रश्न दोघांपैकी सोडविणार कोण, असा प्रश्न आता पडला आहे. 

पालिका निवडणुकीत शहराच्या सर्वांगीण विकासास कटिबद्ध राहून "स्वच्छ व सुंदर शहर' बनविण्याबरोबरच नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असल्याची आश्वासने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काकू - नाना विकास आघाडीने दिली. बीडवासीय जणू दोघांच्याही आश्वासनाला भुलले आणि दोघांनाही कमी-अधिक प्रमाणात कौल दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली तर उपनगराध्यक्षपद आघाडीचे हेमंत क्षीरसागर यांना मिळाले. इतर सर्व सभापतिपदेही त्यांच्याच गटाला मिळाली. पदे मिळविण्यासाठी दोन्ही गटांनी केलेला खटाटोप सर्वश्रुत आहेत. पण, आता शहर जणू बकालच होत आहे. एखाद्या खेड्यातील नाल्या बऱ्या म्हणण्याची वेळ बीडकरांवर आली आहे. 

शहरातील अनेक भागांत नाल्या तुंबल्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून सफाई कामगारच या भागात फिरकले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. आता याची जबाबदारी घेणार कोण, असा प्रश्न आहे. शहरातील सार्वजनिक भागात मांडलेल्या कचराकुंड्याही ओव्हरफ्लो झाल्याने दुर्गंधी पसरत आहे. नाल्या आणि कचराकुंड्यांच्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

जालना रोडलगत असलेल्या स्वराज्यनगर भागात नालीचे बांधकाम झालेले नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. या भागासह पालवण रोडसह शहेंशाहवली दर्गा रोडवरही दुरवस्था आहे. सावता माळी चौकातही तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. मागच्या महिन्यात शहरातून "स्वच्छता अभियान फेरी' निघाली. या फेरीतून, ना नागरिकांनी धडा घेतला ना सत्ताधाऱ्यांनी कुठली पावले उचलली. सत्ताधाऱ्यांच्या या खेळात प्रशासनही सुस्तच आहे. 

या गोष्टींची तत्काळ आवश्‍यकता 
शहेंनशावली भागात नाल्यांचे बांधकाम, पंचशील नगर, स्वराज्यनगर, सुभाष रोड, माळीवेस, सावता माळी परिसर, गांधीनगर भागांत साफसफाई व नवीन नाल्यांचे बांधकाम होणे गरजेचे आहे. बिंदुसरा नदीत शहरातून वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. 

घरचाच आहेर 
शहरवासीयांना मिळत नसलेल्या मूलभूत सुविधेबद्दल राष्ट्रवादीच्या नगरसेविका जयश्री विधाते यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्याच पक्षाचे नगराध्यक्ष असल्याने "पक्षाच्या किंवा नेत्याच्या विरोधात बंड नसल्याचा' खुलासाही त्यांनी केला असला तरी त्यांनी दिलेली प्रतिक्रीया सर्व काही सांगून जाते. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा थेट आरोप करत निवडणुका संपलेल्या असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सर्व नगरसेवकांनी नागरिकांचे सेवक म्हणून काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

गांधीनगर भागात कचरा व्यवस्थापन नाही, नाल्यांचे बांधकाम नसल्याने दुर्गंधी सुटली आहे. यातून येथे साथीचे रोग पसरत आहेत. 
- इम्रान शहा, गांधीनगर 

स्वराज्यनगर भागातील जालना रोडलगत असलेल्या नाल्यांची बांधकामेच झालेली नाहीत. येथे आम्ही स्वखर्चातून पाईप टाकले आहेत. येथील लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. येथील नाली नेहमीच तुंबलेली असते. 
- अजय सुरवसे, स्वराज्यनगर 

Web Title: beed civic issue