
Beed crime new : स्वत:च्या पाच वर्षीय अल्पवयीन पुतणीवर अत्याचार ; आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरी
अंबाजोगाई : स्वत:च्या पाच वर्षीय अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याच्या आरोपात चुलत्यास दोषी ठरवून येथील अपर सत्र जिल्हा न्यायाधीश एस.जे. घरत यांनी वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
२०१८ मध्ये सदरील चिमुकली खेळत असताना तिच्या चुलत्याने तिला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घरी सांगितले तर ठार मारण्याची धमकीही त्याने तिला दिली. या घटनेचा पीडिताच्या आईच्या तक्रारीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात पोक्सो अन्वये गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.
या प्रकरणाची सुनावणी येथील अपर सत्र जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.जे. घरत यांच्यासमोर झाली. त्यात त्यांनी सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले. घटनेतील साक्षीपुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी चुलत्यास वीस वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी वकील ॲड. शिवाजी मुंडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांना विधिज्ञ सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.