बीड डीसीसीचा दुजाभाव! वैद्यनाथला कर्ज, अन् सुरू असणाऱ्या 'अंबा', 'जयभवानी'ला नकार!   

beed dccbank.jpg
beed dccbank.jpg

बीड : मागच्या वर्षीच्या जोरदार पावसाने जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. कारखान्यांच्या गाळपावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मदार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा पुढे करत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला कर्ज मंजूर करत आहे. मात्र, कर्ज मागणी करणाऱ्या अंबा, जयभवानी या कारखान्यांच्या कर्जासाठी मात्र हात आखडत आहे. 

वास्तविक वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे गाळप अद्याप सुरू झालेले नसून अंबा सहकारी साखर कारखाना व जयभवानी सहकारी साखर कारखान्यांचे गाळप सुरू होऊन साखरही बाहेर पडली आहे. या कारखान्यांनाही शेतकऱ्यांचाच ऊस गाळप होत असल्याचे जिल्हा बँक का विसरत आहे असा सवाल आहे. 

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने कर्ज हमी दिली आहे. कर्जहमीवरूनही राजकीय वादळ उठले होते. या हमीच्या जोरावरच जिल्हा बँक या कारखान्याला २५ कोटी रुपये कर्ज मंजूर करून १६ कोटी रुपये वाटप करण्याच्या तयारीत आहे. या कर्जावरूनही चांगलेच राजकीय आणि प्रशासकीय वादळ उठले. याच्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक आणि लातूर येथील सहनिबंधकांनीही वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला बँकेने कर्ज देऊ नये अशी आडकाठी घातली. मात्र, बँकेवर वर्चस्व असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे याच वैद्यनाथ कारखान्याच्याही अध्यक्ष आहेत. त्यामुळे या कारखान्याच्या कर्जासाठीच्या कथित बैठकीच्या प्रोसिडिंग रजिस्टरची पळवापळवी आणि माहितीवरून बँक अधिकारी व अध्यक्षांवरही अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली. 

पण, नेत्यांचाच कारखाना असल्याने बैठक झाल्याची नोंद आणि संचालकांच्या स्वाक्षऱ्यांची सर्व जुळवाजुळव झाली. ओरड आणि शासकीय विभागांच्या निर्देशाउपरही बँक या कारखान्याला कर्ज देत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्ज द्यावे असा मुद्दा पुढे केला जात आहे. त्याच वेळी अंबा सहकारी साखर कारखाना आणि जयभवानी सहकारी साखर कारखान्यांनीही जिल्हा बँकेला कर्ज मागितले आहे. मात्र, या दोन कारखान्यांच्या कर्ज मागणी प्रस्तावाला मात्र आडकाठी घातली जात आहे. या कारखान्यांवरही शेतकऱ्यांचाच ऊस गाळप होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही कारखान्यांचे गाळप पंधरवड्यापूर्वीच सुरूही झालेले आहे. मग, बँक असे दोन वेगवेगळे नियम का लावत आहे, असा प्रश्न आहे. 

चार कारखान्यांना सरकारची थकहमी 
यंदाच्या हंगामासाठी राज्य सरकारने जिल्ह्यातील चार सहकारी साखर कारखान्यांना कर्ज थकहमी दिलेली आहे. यामध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, जयभवानी सहकारी साखर कारखाना तसेच अंबा सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. यापैकी वैद्यनाथ, जयभवानी व अंबा या तीन सहकारी साखर कारखान्यांनी गाळपासाठी जिल्हा बॅंकेकडे कर्ज मागणी केली. अद्याप सुरु नसलेल्या वैद्यनाथला जिल्हा बॅंकेने कर्ज मंजूर केले. पण, थकहमी असलेल्या आणि गाळप सुरू झालेल्या अंबा व जयभवानी कारखान्यांचे प्रस्ताव लांबच आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com