जिल्हा बँक निवडणूक: 'बँक मतदार संघात’ भाजपच्या गटाला राष्ट्रवादीचा गळ

beed district bank election
beed district bank election

बीड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवा सोसायटी मतदार संघाच्या ११ जागांची निवडणूक नसल्याने उर्वरित आठ जागांची निवडणुक लुटूपुटूची लढाई होईल, हा अंदाज फोल ठरला आहे. राष्ट्रवादीने निवडणूक मनावर घेतली असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही यासाठी तळ ठोकला आहे. त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. १८) राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांचा प्रमुख नेत्यांशी परिचय मेळावा झाला.

निवडणूक होत असलेल्या सात मतदार संघांपैकी नागरी बँक पतसंस्था मतदार संघासाठी भाजपचा एक तगडा गट राष्ट्रवादीच्या गळाला लागला आहे. या मतदार संघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदीही अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे ट्विस्ट आणि चुरस निर्माण झाली आहे. तर, इतर शेती प्रक्रिया मतदार संघातही मोठी चुरस आहे. कारण माजी आमदारांसह भाजपचेच दोन उमेदवार आमने - साने असल्याने इथेही रंगत पहायला मिळणार आहे.

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नसून त्यांच्याकडून अद्याप खुल्या हालचालीही दिसत नाहीत. दरम्यान, उस्मानाबादचे जिल्हा उपनिबंधक असलेले विश्वास देशमुख बँकेचे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत होते. मात्र, त्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे आता लातूरचे जिल्हा उपनिबंधक समृत देशमुख यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. 

मुंडेंच्या उपस्थितीत उमेदवार परिचय-
बँकेच्या सात मतदार संघातील आठ जागांची निवडणूक होत आहे. मात्र, महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलला केवळ सहा उमेदवार उभा करता आले आहेत. महिला राखीव मतदार संघाच्या दोन जागांसाठी या आघाडीचे उमेदवारच रिंगणात नाहीत. दरम्यान, रवींद्र दळवी, कल्याण आखाडे, सूर्यभान मुंडे, अमोल आंधळे, भाऊसाहेब नाटकर व गंगाधर आगे या उमेदवारांचा प्रमुख नेत्यांशी परिचय पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत परिचय करुन देण्यात आला.

निवडणूक कोणतीही असली तरी पूर्ण शक्तीने सामोरे जाण्याची माझी सवय असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. ही निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांसाठी उदाहरण ठरेल अशी तयारी केल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, उषा दराडे, केशव आंधळे, विजयसिंह 
पंडित, डी. बी. बागल, सय्यद सलिम, पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, गोविंद देशमुख, प्रा. सुशीला मोराळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, कमल निंबाळकर, 
रेखा फड, दादासाहेब मुंडे, रामकृष्ण बांगर, बन्सीधर सिरसाट, दत्ता पाटील, 
विलास सोनवणे, बहादूर पाटील, नंदकुमार मोराळे आदी उपस्थित होते.

बँक मतदार संघात भाजपचा गट गळाला
दरम्यान, बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांची माघार आणि अनेक वर्षानंतर सारडा कुटूंबातील उमेदवार रिंगणात नसणे या दोन महत्वाच्या घटना भाजपच्या गोटात घडल्या आहेत. पण, या मतदार संघातील आघाडीचे उमेदवार हे आमदार सोळंके यांचे समर्थक आहेत. तर, दुसरीकडे अपक्ष म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकीशोर मोदीही रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. त्यातच आता भाजपच्या या मतदार संघातील एका गटाला राष्ट्रवादीने गळ घातली असून शनिवारी आमदारांसोबत या गटाची बीडच्या त्यांच्याच निवासस्थानी बैठक झाली. यापूर्वीचे राजकीय ऋणानुबंध आणि दुसऱ्या पक्षात असूनही केलेल्या मदतीची आठवण करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता आणखीच या मतदार संघात रंगत आणि ट्विस्ट वाढले आहे.

‘इतर शेती’त भलतीच चुरस; बदलत्या समिकरणांची नांदी
या निवडणुकीत एकमेव माजी आमदार बदामराव पंडित रिंगणात आहेत. त्यांची उमेदवारी इतर शेती संस्था मतदार संघात आहे. त्याहून चुरस म्हणजे भाजपचे माजी आमदार केशवराव आंधळे यांचे पुतणे अमोल आंधळे महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत. त्यामुळे केशवराव आंधळेही आघाडीचा प्रचार करत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव धनराज मुंडे रिंगणात आहेत. मुंडे-आंधळे यांचे आमने-सामने येणे हे भविष्यातील वडवणीच्या स्थानिक राजकारणातील बदलत्या राजकीय समिकरणांची नांदी समजली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com