पशुधनाच्या किमती 25 टक्‍क्‍यांनी घटल्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पावसाळ्याचा तीन महिन्यांचा कालावधी संपत आला तरी अद्यापही बीड जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने चारा व पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

नेकनूर (जि. बीड) - पावसाळ्याचा तीन महिन्यांचा कालावधी संपत आला तरी अद्यापही बीड जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने चारा व पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पशुधन सांभाळणे सध्या शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचे पशुधन बाजारात दिसत असून, ग्राहक नसल्याने जनावरांच्या किमतीत 25 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. दरवर्षी या भागात दुष्काळजन्य परिस्थिती असते. फक्त पावसाळ्यात जनावरांना खाण्यासाठी मुबलक चारा-पाणी असतो. उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा व पाणी मिळणे शक्‍यच नसते. यावर्षी तर परिस्थिती अगदी विदारक झाली असून, पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी या भागात केवळ 110 मिलिमीटर एवढाच पाऊस झाल्याने नदी-नाले, तलाव, विहिरी, हातपंप कोरडेठाक असून, दूरदूरपर्यंत पाणी दिसून येत नाही. अजूनही खाण्यायोग्य चारा झालेला नाही. खाण्यासाठी वैरण नाही. पिण्यासाठी पाणी नाही. यामध्ये पशुधन सांभाळायचे कसे? वैरणीची एक पेंडी घ्यायचे म्हटले तर पन्नास रुपये मोजावे लागतात. एक जनावर दररोज किमान पाच पेंड्या वैरण खाते. जनावरांची भूक उसावर भागवावी म्हटले तर ऊसही साडेचार हजार रुपये प्रतिटन दराने विकला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Drought