बीडच्या उपनगराध्यक्षाची १७ जानेवारीला होणार निवड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

बीड - पीठासीन अधिकाऱ्यांच्या ऐनवेळच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे वादात सापडलेल्या बीड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अखेर मंगळवारचा (ता. १७) मुहूर्त ठरला आहे. तीन दिवसांत उपनगराध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलाविण्याचे आदेश गुरुवारी (ता. १२) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर शुक्रवारी (ता. १३) जिल्हा प्रशासनाने बीड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी बोलावली आहे. त्यासाठीच्या नोटिसा जिल्हा प्रशासनाने नगरसेवकांना पाठविल्या आहेत. 

बीड - पीठासीन अधिकाऱ्यांच्या ऐनवेळच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे वादात सापडलेल्या बीड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अखेर मंगळवारचा (ता. १७) मुहूर्त ठरला आहे. तीन दिवसांत उपनगराध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलाविण्याचे आदेश गुरुवारी (ता. १२) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर शुक्रवारी (ता. १३) जिल्हा प्रशासनाने बीड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी बोलावली आहे. त्यासाठीच्या नोटिसा जिल्हा प्रशासनाने नगरसेवकांना पाठविल्या आहेत. 

बीड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित नगरपालिकेची पहिली बैठक दहा जानेवारीला बोलाविण्यात आली होती; मात्र बैठक सुरू होण्याच्या काही मिनिटे अगोदर प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दाखवीत नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी ही बैठक पुढे ढकलली होती. यामुळे सभागृहात बहुमतात असलेल्या काकू-नाना विकास आघाडी व एमआयएम स्वतंत्र गटाच्या नगरसेवकांनी यात जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून स्वतःच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी, अशी मागणीही केली होती; मात्र ती मागणी फेटाळत राज्य सरकारचे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. दरम्यान, बीडच्या उपनगराध्यक्ष निवडीची बैठक घेण्यासाठी प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका अमर नाईकवाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. नगर पंचायत अधिनियम कलम ५ नुसार पहिली सर्वसाधारण सभा रद्द करता येत नाही आणि गरज पडल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून भूमिका पार पाडत, ही बैठक घ्यावी, असा दावा अमर नाईकवाडे यांच्या वतीने उच्च न्यायालयात केला गेला. त्यांचा दावा ग्राह्य धरत न्यायमूर्ती संगीतराव पाटील आणि न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांच्या पीठाने गुरुवारी (ता. १२) बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तीन दिवसांत बैठक बोलाविण्याचे आदेश दिले होते. याबाबतचे आदेश शुक्रवारी (ता. १३) सकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले.

त्यानंतर लगेच जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी ही बैठक बोलाविण्याचा निर्णय घेत, तशा नोटिसा नगरसेवकांना काढल्या आहेत. या बैठकीचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षच भूषविणार असून ते उपस्थित राहू शकत नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. 

असे आहे पक्षीय बलाबल
आजघडीला ५० सदस्यीय बीड नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे १८ तर काकू-नाना विकास आघाडीकडे स्वतःचे २० आणि एमआयएमच्या स्वतंत्र गटाचे ७ अशा २७ सदस्यांचे पाठबळ आहे. याशिवाय शिवसेनेचे २ तर भाजपचा १ नगरसेवक असून एमआयएमच्या दुसऱ्या गटाचे २ नगरसेवक आहेत.

नगराध्यक्षांनी बोलाविली १९ जानेवारीला बैठक
एकीकडे जिल्हा प्रशासनाने उपाध्यक्ष निवडीची बैठक १७ जानेवारीला बोलाविली असताना दुसरीकडे बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून गुरुवारी (ता. १९) नगरपालिकेची उपाध्यक्ष निवडीची बैठक बोलाविली आहे. त्यांनी काढलेल्या नोटिसीमध्ये १० तारखेची बैठक पुढे ढकलण्यात आल्याने ती आता १९ जानेवारीला होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष निवडीची बैठक पुन्हा एकदा वादात सापडणार असल्याची चिन्हे आहेत.

Web Title: beed dy. chairman selection