बालाघाटच्या रानमेव्याची वाटसरूंना गोडी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

हैदराबाद येथील निजामाला बीड जिल्ह्यातील सीताफळाची गोडी समजली. त्याने बीडचे सीताफळ हैदराबादेत नेऊन रुजवले. आजवर जिल्ह्यातील हे बहुगुणी फळ दुर्लक्षित होते. मात्र अलीकडे बीडच्या सीताफळाची गोडी जगभर गेली आहे.

बीड : बीड जिल्ह्यातील धारूर, पाटोदा अशा तालुक्यांतून पसरलेल्या बालाघाटच्या डोंगररांगेतील अस्सल रानमेवा म्हणजे सीताफळ आणि करवंदे. सध्या सीताफळांचा मोसम असल्यामुळे या भागातून सीताफळांची मागणी वाढत आहे. धारूरच्या, मांजरसुंब्याच्या घाटात सीताफळ विक्रीसाठी बसलेल्या स्थानिक शेतकऱ्यांकडून प्रवासी टोपलीच्या टोपली सीताफळे विकत घेताना दिसत आहेत.

बालाघाटच्या डोंगररांगा प्रसिद्ध आहेत त्या अवीट गोडीच्या बालानगरी सीताफळासाठी. खुद्द हैदराबाद येथील निजामाला बीड जिल्ह्यातील सीताफळाची गोडी समजली. त्यानंतर निजामाने बीडचे सीताफळ हैदराबादेत नेऊन रुजवले होते. आजवर जिल्ह्यातील हे बहुगुणी फळ दुर्लक्षित होते. मात्र अलीकडे बीडच्या सीताफळाची गोडी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून त्यादृष्टीने काम सुरू झाले. बालाघाटावरील सीताफळ हे जगातील उपलब्ध सीताफळापेक्षा अधिक गोडीचे असल्याचा निष्कर्ष अभ्यासातून समोर आला आहे. या फळाची नैसर्गिकरीत्या होणारी वाढ, वाढीसाठी केवळ पावसाचे पाणी आणि डोंगरदऱ्यांतील वातावरण आणि वेगळी माती यामुळे याला वेगळी चव आणि गंध लाभल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. 

Image result for custard apple

नायगाव मयूर अभयारण्य

नायगाव (मयूर) हे मयूर अभयारण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नायगावच्या या वैशिष्ट्याबरोबरच येथील रानमेवा म्हणजेच सीताफळ व डोंगरची मैना म्हणून प्रसिद्ध असलेली करवंदेदेखील तितकीच प्रसिद्ध आहेत. याच सीताफळांचा सध्या या ठिकाणी मोसम असून येथे सध्या सीताफळांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. बीड-नगर रोडवरील प्रवासी मोठ्या प्रमाणात या सीताफळांची खरेदी करीत आहेत.

हेही वाचा - मेंदू न उघडता ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया शक्य

धारूरच्या, नायगावच्या डोंगरात सीताफळांच्या झाडांची मोठी संख्या आहे. यंदाही सीताफळे मोठ्या प्रमाणात आली आहेत. नायगाव ते रोहतवाडी यादरम्यान असलेल्या घाटातील रस्त्याच्या कडेला या भागातील मुले व महिला सीताफळ विक्रीसाठी घेऊन बसत आहेत. या रस्त्यावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यामुळे हे प्रवासी आपले वाहन थांबवून सीताफळाची चव चाखत आहेत.

Image result for custard apple

या भागातील महिला व मुले पहाटेच डोंगरात जाऊन ही सीताफळे तोडून आणतात व सकाळीच विक्रीसाठी ठेवतात. येथे पिकलेल्या सीताफळाचे वेगळे व कच्च्या सीताफळाचे वेगळे असे दर आहेत, तर काही विक्रेते येथील ग्रामीण भाषेत सीताफळांचा ढिगारा करतात व असा ढिगारा 80 ते 100 रुपये किमतीत विकतात. येथील सीताफळांचे वैशिष्ट्य म्हणजे ही सीताफळे चवीला अत्यंत गोड आहेत तर काही ग्राहक कच्ची सीताफळे घेऊन आपल्या घरी पिकवतात. एकूणच आता येथील सीताफळांची गोडी आता सर्वत्र पसरत असून यातून महिलांनाही रोजगार मिळत आहे.

प्रक्रिया उद्योगासाठी संधी

बालाघाटाच्या सीताफळापासून सीताफळ गर, त्यापासून पावडर, आईस्क्रीम, रबडी बनवणे यासारख्या उद्योगांना चांगला वाव आहे. विशेष म्हणजे सीताफळ गर काढण्यासाठी आता मशिनही उपलब्ध झाल्याने या उद्योगासमोरील मुख्य अडचण दूर झाली आहे. बालाघाटातील सीताफळाचा गोडवा वॉशिंग्टन, ब्रिटिश घ्वाना येथील सीताफळापेक्षा अधिक (टोटल सोल्युबल शुगर) आहे.

काय म्हणता? - बीडमधून कोणाला मिळणार मंत्रिपदाची संधी?

बीडच्या सीताफळाला वेगळी वैशिष्ट्ये असल्याने याला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळण्यासाठी चेन्नई येथील संस्थेकडे सबमिशन करण्यात आले होते. या संस्थेसमोर दिल्ली येथे बीडच्या सीताफळाचे सादरीकरण केल्यानंतर त्याचे वेगळेपण समितीसमोर मांडण्यात आले. त्यानंतर या संस्थेने सीताफळाला मानांकन दिले. यामुळे कोल्हापूरचा गूळ, नाशिकची द्राक्षे आणि महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणि बीडच्या सीताफळाचा समावेश भौगोलिक मानांकनात झाला. 

Image result for custard apple

पोषक हवामानामुळे गोडी

जिल्ह्यात सीताफळाला पोषक हवामान आहे. मुख्यत: जिल्ह्यात सीताफळाची बालानगरी जात आढळते. या पिकास बीडची कमी पर्जन्यमानाची स्थिती अनुकूल आहे. पाणी माफक प्रमाणात लागत असल्याने ते बीडमध्ये पाहिजे तेवढे मिळतात. त्यामुळे त्याची गोडी जास्त आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भागात पडीक जमीन आहे. या ठिकाणी सीताफळे खाण्यात आल्यानंतर खाल्लेल्या फळांचे बी पडते आणि नैसर्गिकरीत्या सीताफळ उगवून वाढते.

या जमिनीत जी पोषक द्रव्ये आहेत ती यासाठी उपयुक्त आहेत. त्यातच रासायनिक खतांचा संबंध आला नसल्याने शंभर टक्के सेंद्रिय हे फळ आहे. त्याला देखणेपणा आहे. उन्हाळ्यात या पिकाला पाण्याचा ताण आवश्‍यक असतो. नैसर्गिकरीत्या येणाऱ्या या सीताफळाला उन्हाळ्यात पाण्याचा ताण मिळतो आणि त्यामुळे अवीट गोडीची सीताफळे उपलब्ध होतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Famous Custard Apple News