बीड: पेरणी सुरू जोरदार पाऊस गरजेचा

गेवराई तालुक्यात ८३ हजार हेक्टरवर पीक लागवड
beed farmer sowing start
beed farmer sowing start

गेवराई जातेगाव: यंदा पावसाच्या प्रारंभीचे रोहिणी नक्षत्र कोरडे गेले असतानाच मृग नक्षत्राच्या दुसऱ्या आठवड्यात तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली. पुढील पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची तयारी सुरू केली असता पावसाच्या हुलकावणीमुळे पेरणी थांबावी लागली. मृगाच्या पावसावर ४० हजार हेक्टरवर गेवराई तालुक्यात पेरणी झाली. दरम्यान, आर्द्रा नक्षत्राचा प्रारंभ होताच सलग चार दिवस पावसाचे हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा पेरता झाला असून, आतापर्यंत ८३ हजार हेक्टरवरील पेरणी पूर्ण झालेली आहे.

मागील वर्षी अतिवृष्टीत खरिपातील मुख्य कापूस आणि सोयाबीन ही पिके खरडून गेली. या पिकास करण्यात आलेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडला नाही. परिणामी शेतकऱ्यांची मदार उसावर अवलंबून असताना अतिरिक्त ऊस झाल्याने तो गळितास घालण्यास शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. असे असतानाही शेतकऱ्यांनी यंदा पीक पेरणीची तयारी केली आणि पेरणीला सज्ज होताच पावसाच्या लहरीपणामुळे पेरणी मध्येच थांबवावी लागली.

मात्र, मृग आणि आद्रा नक्षत्रात गेवराई तालुक्यात बहुतांश ठिकाणी कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस झाल्याने पुन्हा पेरणीला सुरुवात झाली. ता.२८ जूनपर्यंत कृषी विभागाच्या अहवालानुसार १ लाख ३० हजार हेक्टरपैकी जवळपास ८३ हजार हेक्टरवर खरीप पेरणी झालेली आहे. यामध्ये सर्वाधीक ७१ हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आलेली आहे. परंतु सोयाबीन पेरणी अजून सुरु असून बाजरी पेरणी देखील होणे बाकी आहे.

गेवराई तालुक्यातील जवळपास ८३ हजार हेक्टरवर खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे. सोयाबीन, बाजरी आदी पिकांची पेरणी अद्याप सुरु आहे. पेरणी झालेली अंतिम आकडेवारी सोमवारपर्यंत कृषी विभागाकडून सांगण्यात येईल.

-अभय वडकुते, तालुका कृषी अधिकारी, गेवराई

मुग, उडीद पिकास पोषक असलेल्या मृग नक्षत्रात पेरणी झाली नाही. यामुळे कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र वाढविले आहे. याशिवाय बाजरीची पेरणी बाकी आहे.

-राजेंद्र रोमन, शेतकरी, सिरसदेवी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com