
बीड : रांगोळ्यांतून विद्यार्थ्यांनी दिला राष्ट्रभक्तीचा संदेश
आष्टी : स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी हर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आले आहे. यावर आधारित येथील भगवान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत गुरूवारी विविध देशभक्तीपर रांगोळ्या साकारत विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आझादीचा अमृत महोत्सव लोकसहभागाच्या भावनेने साजरा करणे ही या अभियानामागील संकल्पना आहे.
या अनुषंगाने तसेच माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील भगवान महाविद्यालयात गुरुवारी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत एकूण ४८ स्पर्धकांनी सहभाग घेत रांगोळ्यांच्या माध्यमातून देशप्रेम, देशनिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रध्वजा विषयी अभिमान यासारख्या विविध रांगोळ्या रेखाटून राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. स्पर्धेकरिता प्रा. नुसरत सय्यद, प्रा. शुभांगी बनकर, प्रा. स्मिता दुधे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांच्या मार्गदर्शनात उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव वैद्य, उपप्राचार्य दत्तात्रय रेडेकर, डॉ. बाबासाहेब झिने, डॉ वंदना घोडके, डॉ.दादासाहेब सदाफुले, डॉ.आबासाहेब पोकळे, डॉ.अप्पाराव टाळके, प्रा. श्रीरंग पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला.