esakal | माजलगाव धरणातील उजव्या कालव्याला गळती; अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

बोलून बातमी शोधा

beed canal.

तालुक्यातून माजलगाव धरणाचा उजवा कालवा जातो. या कालव्यातून शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडले जाते

माजलगाव धरणातील उजव्या कालव्याला गळती; अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
sakal_logo
By
प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड): तालुक्यातून माजलगाव धरणाचा उजवा कालवा जातो. या कालव्यातून शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती होती. माजलगावचे धरण न भरल्याने या कालव्याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. पण मागच्यावर्षी पासून माजलगाव धरण शंभर टक्के भरल्याने उजव्या कालव्यातून शेतीच्या सिंचनासाठी पाणी पाळी सोडण्यात येत आहे.

पण ज्या उजव्या कालव्यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत आहे, मात्र कालवा दुरुस्ती अभावी धोकादायक झाला आहे. कालव्यात व कालव्यावर तसेच उपचाऱ्यावर झाडेझुडपे उगवले असून यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी पाजरत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. तो दुरुस्त करण्याची मागणी येथील शेतकरी करत आहेत.

जालना शहरात अवकाळी पावसाची हजेरी, तापमानाचा पारा खाली

माजलगाव धरण हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सिंधफणा नदीवर सिंचन व जलविद्युत निर्मितीसाठी बांधले आहे. या धरणातून शेतीच्या सिंचनासाठी उजवा कालवा तयार करण्यात आला आहे. या उजव्या कालव्याची लांबी १६५ किलोमीटर आहे. त्याची क्षमता ८६.६० घनमीटर/सेकंद असून या कालव्याच्या ओलीताखालील क्षेत्र १३१५२० मीटर व ओलीताखालील जमीन ११९४०० हेक्टर ऐवढी आहे. जसा कालवा तयार झाला त्या वेळेपासून पाटबंधारे विभागाचे लक्ष फक्त ज्यावेळी पाणी पाळी आहे, त्याच वेळेला अधिकारी याकडे तेवढ्या पुरते लक्ष देतात. इतर वेळी मात्र कोणी त्याकडे ढुंकूनही पाहत नाही.

या कालव्यामध्ये सिंमेटचे बांधकाम झालेले असतानाही मुख्य कालव्याच्या मधोमध, बाजूने अनेक झाडेझुडपे उगवले आहेत, त्याच बरोबर काही ठिकाणी त्या भिंतीला तडे गेले आहेत. काही ठिकाणी कालव्याच्या भिंतीेचे पूर्ण सिमेंट निघून गेले आहे. ज्यावेळी कालव्यात पुर्ण क्षमतेने पाणी सोडले जाईल त्यावेळी तो फुटण्याची शक्यता आहे. मधोमध आलेली झाडे वेळोवेळी तोडणे आवश्यक असताना त्याकडे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. या कालव्याचा उजव्या व डाव्या बाजूने जो भराव आहे. त्यावर तर फार मोठी मोठी झाडेझुडपे आलेली आहेत. सिरसाळा रस्ता ते पिंपळगाव, नाथ्रा पर्यंत जागोजागी हिच परिस्थिती पाहावयास मिळते.

एकावे ते नवलच : रस्ता दुरुस्ती दाखवण्यासाठी डांबरी रस्ताच उखडून टाकला....

अनेक ठिकाणी या कालव्यावर गावात जाणारे मुख्य रस्ते क्राँस झाले आहेत. त्याठिकाणी पुले बांधण्यात आली आहेत. आज जवळपास सर्व पुलांना तडे गेले आहेत, काही ठिकाणी भराव खचला आहे. तसेच पुलाचे संरक्षक कठडे पडले आहेत. साधारणपणे १९८० च्या आसपास या पुलांचे काम झाले आहे. तेंव्हा पासून त्याची दुरुस्ती झालेली नाही. सध्या या कालव्याच्या उपचाऱ्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे मात्र या उपचाऱ्यावर झाडेझुडपे, चाऱ्यामध्ये गाळ साचल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर पाजरत आहे. पाजरणाऱ्या पाण्यांमुळे शेतीचा पोत खराब होत आहे. यामुळे या चाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.  

दरम्यान या कालव्याच्या देखभालीसाठी कर्मचारी वर्ग आहे. पण हे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. ज्यावेळी तळ्यात पाणी नाही अशा वेळी लक्ष नाही दिले, तरी काही हरकत नाही पण आता धरणातून पाणी पाळ्या सोडल्या जात आहेत. अशावेळी लक्ष देणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.तालुक्यातील गाढे पिंपळगाव परिसरात मुख्य कालवा व पाच उपचाऱ्या आहेत. या सर्व चाऱ्यातून सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी पाजरत आहे.