शहरातील रस्ते भुयारी गटारीसाठी खोदल्याने चिमुकल्यांनी नगरपरिषेदेलाच बनवले खेळाचे मैदान!

प्रविण फुटके
Tuesday, 2 February 2021

नगरपालिकेच्या वतीने भुयार गटार योजनेसाठी शहरातील गल्लोगल्लीचे रस्ते खोदून ठेवले आहेत.

परळी (बीड): येथील नगरपरिषदेच्या वतीने भुयार गटार योजनेसाठी जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत. काम झाल्यानंतरही अनेक दिवस ते रस्ते तसेच ठेवल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. खोदलेले रस्ते व खेळासाठी मैदान नसल्याने वैतागलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता.०१) नगर पालिका प्रशासनाच्या इमारतीलाच खेळाचे मैदान करून याचा निषेध केला.

नगरपालिकेच्या वतीने भुयार गटार योजनेसाठी शहरातील गल्लोगल्लीचे रस्ते खोदून ठेवले आहेत. पण कामपूर्ण झाल्यानंतर ते रस्ते पुन्हा दुरूस्त करण्याचे नगरपरिषदेकडून उशीर होत आहे. नगरपरिषदेने या भुयारी गटार योजनेसाठी नुकतेच करण्यात आलेले चांगले रस्ते खोदून ठेवले आहेत. काम झाल्यानंतर गल्ली बोळातील रस्ते लवकर दुरुस्त करणे आवश्यक आहे. कारण त्या गल्लीत दुसरा पर्यायी रस्ता नसतो. गल्लीत लहान लहान मुले यांची मोठी अडचण होत आहे. म्हणून हे रस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करत शास्त्रीनगर मधील शाळकरी मुलांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. 

सुनांनी वयोवृद्ध सासूला दरमहा प्रत्येकी एक हजार रुपये पोटगी द्यावी

मुलांनी नगरपालिकेतच मांडला खेळ
दरम्यान, रस्ता दुरूस्त करण्यासंदर्भात अनेक वेळा निवेदन, अर्ज, विनंत्या करूनही नगरपरिषद काही उपाययोजना करत नसल्याचे दिसले. त्यामुळे वैतागलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी नगरपरिषद कार्यालयावरच धडक मारली व तिथल्या मोकळ्या जागेतच वेगवेगळे खेळ खेळण्यास सुरवात केली. भांबावलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण मुलांनी खेळ सुरूच ठेवला. शेवटी खेळ थांबवून घोषणा देत त्यांनी कार्यालय अधीक्षक संतोष रोडे यांना निवेदन दिले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beed latest news parali news children makes Municipal Council building as playground