जिल्ह्यात ७८ टक्के पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

परळीचा वाण मध्यम प्रकल्प तुडुंब, शेतकऱ्यांना दिलासा

परळीचा वाण मध्यम प्रकल्प तुडुंब, शेतकऱ्यांना दिलासा

बीड - यावर्षी पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय? अशी स्थिती असतानाच १९ ऑगस्टपासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरवात झाली. गेल्या पंधरा दिवसांत सातत्याने अधूनमधून पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ७७.९५ टक्के इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली असून बिंदुसरा, महासांगवी, कांबळी, तलवार, ऊर्ध्व कुंडलिका या मध्यम प्रकल्पांपाठोपाठ आता परळी तालुक्‍यातील वाण मध्यम प्रकल्पही तुडुंब भरला आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. गतवर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत दुष्काळजन्य परिस्थिती होती; मात्र ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती. यावर्षीही चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असताना जूनमध्ये झालेल्या पावसानंतर तब्बल दोन महिने पावसाने उघडीप दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावली होती. यामुळे शेतकरी चिंतातुर असतानाच १९ ऑगस्टपासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यानंतरपासून गेल्या वीस दिवसांत सातत्याने अधूनमधून पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. आजघडीला पावसाच्या सरासरी ६६६ मिमी या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५१९.४० मिमी म्हणजेच ७७.९५ टक्के इतका पाऊस झाला आहे. १ जून ते १० सप्टेंबर या कालावधित होणाऱ्या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत हा १०६.६३ टक्के इतका पाऊस असल्याची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे. गतवर्षी आजच्या तारखेत केवळ ३७८.३० मिमी इतका पाऊस झाला होता. यावर्षी त्यामध्ये मोठी वाढ झाल्याने शेतकरी सुखावला असून, आगामी काळात परतीच्या पावसातही मोठे पाऊस झाल्यास यावर्षीही पाऊस वार्षिक सरासरी ओलांडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: beed marathwada news 78% rain in beed district