बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा संपर्क तुटला

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा संपर्क तुटला
बीड - डोकेवाडा, भंडारवाडी, कर्झनी तलाव तुडुंब भरल्याने बिंदुसरा धरणात रविवारी (ता.27) रात्री पाणीसाठा वाढला. कपिलधार धबधब्याच्या पाण्यामुळे बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहू लागली. यामुळे बिंदुसरा नदीवरील जीर्ण झालेल्या जुन्या पुलालगत उभारण्यात आलेल्या पर्यायी पुलावरून काल सायंकाळी पाणी वाहू लागले. रात्री नदीच्या पाण्यात वाढ होत गेली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने हा पर्यायी पूल सोमवारी वाहून गेला. ऐन मधोमध पूल वाहून गेल्याने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा संपर्क तुटला आहे.

बीड तालुक्‍यात काल पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे डोकेवाडा, कर्झनी तलाव तुडुंब भरले. दोन्ही तलावांतील पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने बिंदुसरा धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढली. बार्शी नाक्‍यावरील जुना पूल रहदारीसाठी आधीच बंद केलेला आहे. त्याच्या शेजारी उभारण्यात आलेला पर्यायी पूलही पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक वळविण्यात आली होती.

सोशल मीडियावर राजकीय रणधुमाळी
शहरातील बिंदुसरा नदीपात्रावरील नवीन पुलावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. काकू-नाना विकास आघाडीच्या नगरसेवकांनी दोन महिन्यांपूर्वी पाण्यात उतरून आंदोलन केले होते. शिवाय खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासमोरच सत्ताधाऱ्यांसह आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर क्षीरसागर यांनी पुलाला मंजुरी मिळाल्याचे जाहीर करून नंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्‍न मांडला होता. पर्यायी पूल वाहून गेल्यानंतर रविवारी रात्रीपासून सोशल मीडियावर राजकीय पदाधिकारी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असून, पूल प्रश्‍नावरून पुन्हा राजकीय रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र आहे.

Web Title: beed marathwada news alternate bridge gone on bindusara river