बनावट नोटा छपाईचे रॅकेट बीडला उघड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

बीड - मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात आढळलेल्या बनावट नोटांचे बीड शहरात कनेक्‍शन असल्याचे उघडकीस आले आहे. मध्य प्रदेशातील बरोई ठाण्याच्या पोलिसांनी बीड पोलिसांच्या मदतीने शेख शखूर ऊर्फ राणाभाई शेख शब्बीर (रा. तेलगाव नाका, नाळवंडी रोड, बीड) याच्या काल (ता. 25) रात्री मुसक्‍या आवळल्या. जेमतेम आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राणाभाईने अवघ्या दोन महिन्यांत तब्बल पाच लाख रुपयांच्या नोटा छापल्या असून, मध्य प्रदेशातील मित्राच्या साह्याने त्या चलनात आणल्या. पत्र्याच्या साध्या शेडमध्ये त्याचा हा बनावट नोटा छापण्याचा धंदा चालत असल्याचेही उघड झाले आहे.

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील बरोई ठाणे हद्दीत एक व्यक्ती शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून बरोई ठाण्याचे प्रमुख मनीष जादौन यांनी करतारसिंह लक्ष्मीनारायणसिंह नटवरिया (रा. भिंड, मध्य प्रदेश) यास पकडले. त्याच्याकडे शंभर रुपये दराच्या 61 हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांच्या चौकशीत त्याने या नोटा बीडमधील शेख शखूर ऊर्फ राणाभाई शेख शब्बीर याच्याकडून आणल्याची व 30 हजार रुपयांत एक लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्याची कबुली दिली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी जादौन यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कॉन्स्टेबल रामेश्‍वर शर्मा, भूपेंद्र राजावत, योगेन चौहान यांचे पथक बुधवारी (ता. 25) बीडमध्ये धडकले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेऊन त्यांनी राणाभाईला पकडण्यासाठी पेठ बीड ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार जाधव यांच्या मदतीने सापळा लावला. मध्य प्रदेश पोलिस व पेठ बीड पोलिसांच्या संयुक्त पथकाने नाळवंडी रोडवरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील कट्ट्यावरून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. मध्य प्रदेश पोलिसांनी आज दुपारी त्याला बीड येथील न्यायालयात हजर केले. नंतर त्याला घेऊन पोलिस मध्य प्रदेशाकडे रवाना झाले.

हर्सूल कारागृहात ठरला प्लॅन
बलात्काराच्या गुन्ह्यात शेख शखूर औरंगाबादेतील हर्सूल कारागृहात होता. तेथे करतारसिंह नटवरिया हा अवैध शस्त्रास्त्र प्रकरणात अटकेत होता. अंबड येथील शेख आमेरही एका गुन्ह्यात त्यांच्यासोबत कारागृहात होता. तेथेच या तिघांची ओळख झाली. शेख शखूरने कारागृहातच करतारसिंहकडून बनावट नोटा छापण्याचे तंत्र जाणून घेतले आणि कारागृहातून बाहेर आल्यावर तो बनावट नोटा छापू लागला आणि करतारसिंह याच्यामार्फत त्या नोटा तो चलनात आणू लागला.

कोण आहे हा राणाभाई?
शेख शखूर ऊर्फ राणाभाई हा चाळिशीतील आहे. त्याला दोन भाऊ असून घरची आर्थिक स्थिती जेमतेम. तेलगाव नाक्‍याजवळील नाळवंडी रोडलगत बहिणीच्या आठ पत्र्यांच्या खोलीत तो वास्तव्याला आहे. त्याला दोन मुले असून पाच वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. मुलांचा सांभाळ त्याचा भाऊ करतो. राणाभाई पूर्वी फळविक्रीचा व्यवसाय करायचा. पत्नीच्या निधनानंतर अंबड येथील नात्यातीलच मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा नोंद झाला होता.

दिवसा भटकंती, रात्री छपाई
राणाभाई हा तेलगाव नाका भागातील आपल्या गल्लीतही फारसा कोणाला परिचित नव्हता. त्याला कोणी मित्रही नाहीत. मध्यरात्रीनंतर तो राहत्या खोलीतच शंभर रुपयांच्या बनावट नोटा छापत असे. एका रात्रीत जवळपास दहा हजार रुपयांच्या नोटांची छपाई करण्याचे तंत्र त्याने अवगत केले होते. सकाळी भाऊ व शेजारी झोपेतून उठण्याआधीच शेख शखूर घराला कुलूप लावून बाहेर निघून जायचा. दिवसभर शहरात भटकंती केल्यावर रात्री उशिरा तो घरी परतायचा.

अशी होती नोटा छापण्याची पद्धत
राणाभाईने 15 दिवस बनावट नोटा छापण्याचा सराव केला. प्रिंटर कम झेरॉक्‍स यंत्रामध्ये कागदावर शंभर रुपयांची नोट ठेवून तो बनावट नोटा तयार करत असे. हुबेहूब वैध नोटांप्रमाणे दिसणाऱ्या बनावट नोटा तो करतारसिंहकरवी मध्य प्रदेशात चलनात आणत असे. त्याने पन्नास रुपयांच्या बनावट नोटा छापण्याचा प्रयत्न केला होता. त्यापूर्वीच त्याचा पर्दाफाश झाला. कलर प्रिंटर, शंभर रुपये दराच्या दीड लाख रुपयांच्या बनावट नोटा व संगणक, तसेच कागद असे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून, घराला सील ठोकल्याची माहिती पेठबीड ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार जाधव यांनी दिली.

Web Title: beed marathwada news bogus currency printing racket