आणखी एका सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश

आणखी एका सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश

बीड - शहरातील इंदिरानगर भागात रविवारी (ता. पाच) रात्री पोलिसांनी छापा टाकून वेश्‍या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या वेळी या दलदलीत अडकलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी चार तरुणांना पकडले असून, यातील मुख्य आरोपी असलेली आंटी फरार आहे. यापूर्वी एक सेक्‍स रॅकेट समोर आलेले असताना, आणखी एका सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने या रॅकेटची पाळेमुळे शहरात खोलवर रुजल्याचे समोर आले असून, या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सय्यद आमेर सय्यद अमीन, शेख मुजम्मील शेख सत्तार (दोघे रा. बीड), श्रीहरी लहू धाईजडे (रा. चाकरवाडी, ता. बीड) व दादासाहेब जालिंदर मस्के (रा. गवळवाडी, ता. बीड) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हा कुंटणखाना चालविणारी आंटी शेख मदिनाबी इफ्तेखार (रा. इंदिरानगर) ही फरार झाली आहे. शहरातील इंदिरानगर भागातील एका घरात वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार उपअधीक्षक सुधीर खिरडकर, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या फौजदार दीपाली गिते, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी रविवारी (ता. पाच) रात्री सापळा लावला. तीन महिलांकडून वेश्‍या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे यामध्ये समोर आले. या वेळी चौघांना अटक करण्यात आली. आंटी शेख मदिनाबी पळून जाण्यात यशस्वी झाली. दरम्यान, ज्या खोलीत हे कुकर्म सुरू होते, तेथे तीन पीडित महिला आढळून आल्या. त्यांची पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अशी झाली कारवाई
नाट्यगृह रोडवरील इंदिरानगर भागातील एका घरात वेश्‍या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी तेथे आपलाच माणूस डमी ग्राहक म्हणून पाठविला. त्यानंतर सदर ठिकाणी छापा टाकून पुढील कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान तेथे चार ग्राहक आढळून आले. पोलिसांना पाहून त्या सर्वांची अक्षरश: भंबेरी उडाली. पीडित तीन महिलांपैकी एक बीडची रहिवासी असून, दोघी अहमदनगर येथील आहेत. त्या तिघीही विवाहित आहेत. दरम्यान, पीडित महिलांकडे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे. इंदिरानगर भागात मागील सहा महिन्यांतील ही दुसरी कारवाई असून यापूर्वीही पोलिसांनी या भागात वेश्‍या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com