गरिबांचे घर बुडविणाऱ्यांचाच हल्लाबोल - पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

बीड - जिल्हा बॅंकेतील सामान्यांच्या ठेवी बुडविल्या, शासनाच्या जागांवर संस्था उभा केल्या, गरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरविणारे नेतेच हल्लाबोल यात्रा काढताहेत. भाषणे करताना आपण काय केले, याचा विचार करत नाहीत, असा टोला पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता. २१) राष्ट्रवादी नेत्यांच्या आरोपांना लगावला.

‘जेव्हा यांच्याकडे जिल्हा परिषदेपासून केंद्रापर्यंतची सत्ता होती तेव्हा यांना एक किलोमीटर लांबीचा रेल्वे रूळ अंथरता आला नाही. आपण हल्लाबोल केला तर खरंच बोलू,’ असेही मुंडे म्हणाल्या. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वाधिक निधी आणल्याचे सांगताना ‘आईच्या कळा दाईला येत नसतात’ असा चिमटाही त्यांनी अजित पवारांच्या आरोपांवर काढला.

राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल यात्रेतील जिल्ह्यातील सभांमध्ये राष्ट्रवादी नेते अजित पवार व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर विकासात जिल्हा मागे नेल्याचा आरोप केला होता. यावर रविवारी पत्रकार परिषदेत त्यांनी उत्तर दिले. 

मी पोटतिडकीतून विकासकामे करत आहे. २०१९ पर्यंत नगर - बीड - परळी लोहमार्ग पूर्ण होईल, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. परळी पालिकेने ३५ वर्षांपासून राहणाऱ्या गरिबांच्या घरावर बुलडोझर चालवून त्यांना बेघर केले. असे नेतेच हल्लाबोल करत असल्याचे मुंडे म्हणाल्या. हल्लाबोल यात्रेत पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार व माजी मंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर उपस्थित नव्हते. हा धागा पकडत हल्लाबोलपेक्षा पक्षाने चिंतन करावे, कोणामुळे आपण नेते गमावत आहोत याचा विचार करून पक्ष कोण चालवत आहे याकडे लक्ष द्यावे, असा सल्लादेखील पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.

Web Title: beed marathwada news pankaja munde talking